६ फेब्रुवारी २०२६ या दिवशी भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरले. नुकतेच नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय महिलांनी महिला क्रिकेटचा विश्वकप उंचावला होता. त्यानंतर जेमतेम ३ महिन्यात भारतीयांनी अजून एक विश्वकरंडक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यापूर्वी भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने टी २० वर्ल्ड कप (२०२४) व चॅम्पियन ट्रॉफी आपल्या खिशात टाकली होती. भारताकडेच अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद असताना भारताने मिळवलेले हे यश म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. या पार्श्वभूमीवर भारतीय पुरुष संघ आपले टी २०मधील जगज्जेतपद राखण्यासाठी ७ फेब्रुवारीपासून मैदानात उतरणार आहे. या त्यांच्या मोहिमेला १९ वर्षाखालील वर्ल्ड कपचे कोंदण लाभावे यापेक्षा अधिक चांगला शुभ शकुन कोणता असावा? ( Vaibhav Sooryavanshi )

भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२ या वर्षी १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. यातील काही संघांनी भारतीय क्रिकेटला किमान दोन ‘रत्ने ‘ प्रदान केली आहेत.
२०००च्या विजयी संघाने भारताला मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग हे दोन खेळाडू दिले.
२००८च्या संघातून विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि शिखर धवन ही त्रिमूर्ती बहाल केली.
२०१८ च्या संघातून पृथ्वी शॉ (गुप्ता ) आणि शुभमन गिल हे दोन तारे उदयाला आले.
२०२०च्या उपविजयी संघाने यशस्वी जैस्वाल नावाचा हिरा भारतीय क्रिकेटच्या कोंदणात ‘फिट’ केला.
२०२६ चा संघही मागे नाही. या संघातील बिहारचे ‘आश्चर्य ‘१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि मुंबईचा आयुष म्हात्रे हे भारताचे भविष्यातील ‘वैभव’ असणार आहेत याची चाहूल लागली आहे. हे दोन्ही खेळाडू आधीच आपापल्या संघातून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला लागले आहेत. ( Vaibhav Sooryavanshi )
यंदाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला हरवले ते १०० धावानी. भारताच्या ५० षटकातील ४११ धावांच्या ओझ्याखाली दबून न जाता इंग्लंडने जी ‘नेव्हर से डाय ‘ अशी झुंजार वृत्ती दाखवली ती पराभवाच्या अंतराने पुसली जाऊ शकत नाही. एक वेळ इंग्लंडची ७ बाद १७७ अशी अवस्था झाली होती. दुसरा कुठलाही संघ असता तर त्यांनी अशा स्थितीत ‘हाराकीरी’ केली असती. पण त्यांच्या आठव्या जोडीने पराभव जणू आपल्याकडे ढुंकूनही पहात नाही अशा थाटात खेळ केला. त्यांच्या फॉकनेर नावाच्या खेळाडूने तळाच्या फालंदाजाना हाताशी धरून आपले शतक तर पूर्ण केलेच पण काही काळ भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी १९४७ मध्ये भारत सोडेपर्यंत त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य का मावळत नव्हता त्याचे उत्तर त्यांच्या या पिढीजात लढाऊ वृत्तीत लपलेले आहे असे वाटते. या अशा चिवट संघावरील विजयाचा शिल्पकार होता तो वैभव सूर्यवंशी.
गत काळातील विवियन रिचर्ड्स, ब्रायन लारा नामक वेस्ट इंडियन खेळाडूंचे अनेक डाव हे आजही अख्यायिका बनून राहिले आहेत. वैभव सूर्यवंशी या भारताच्या ‘उगवत्या’ सूर्याची अंतिम सामन्यातील खेळी ही सुद्धा जुनिअर क्रिकेट मधील एक अशीच ‘न भूतो न भविष्यती ‘ खेळी ठरेल यात शंका नाही. ५५ चेंडूत शतक आणि ८० चेंडूत १७५ धावा, त्यात १५ चौकार आणि १५ षटकार, म्हणजेच १७५ पैकी १५० धावा फक्त ३० चेंडूत. एका भारतीय खेळाडूची ही आक्रमकता आणि तीही ज्या गोऱ्यांनी भारताचे १५० वर्षें दमन केले त्यांच्याविरुद्ध. आज भारताचे सध्याचे राज्यकर्ते जेव्हा गुलामगिरीच्या भारतातील खुणा पुसून टाकून भारताच्या आत्मगौरवाच्या इतिहासाची पुनरस्थापना करण्याच्या ध्येयाने झपाटलेले आहेत त्याचीच झलक वैभवच्या या खेळीमध्ये दिसली. जणू १५० वर्षाच्या गुलामगिरीचा प्रतिशोध वैभवने त्या ३० चेंडूत घेतला आणि भारताच्या भविष्यातील ‘वैभवाची’ चुणूक साऱ्या जगाला दाखवली. त्याचा प्रत्येक षटकार/चौकार जणू ब्रिटिशांनी भारताच्या असंख्य क्रांतिकारकांच्या अंगावर उठवलेल्या आसूडांच्या वळांचा सूड घेणारा होता.वैभवची ही खेळी, म्हणूनच, नुसता क्रिकेटच्या मैदानावरील डाव नव्हता तर तो २१व्या शतकातील’ स्वाभिमानी ‘नया’भारताची एक गर्जना होती, एक हुंकार होता.आपणच भारताचे भविष्य आहोत आणि’वैभवी देश चढवीन’ या निग्रहानेच भारतमातेची पूजा बांधण्याच्या ध्येयाने प्रेरित अशा नवोन्मेषित युवा पिढीचे आपण प्रतिनिधी आहोत हे ठसवणारी ही खेळी होती. ( Vaibhav Sooryavanshi )
=======
हे देखील वाचा : Cricket : क्रिकेटमध्ये केवळ तीनच स्टंप का असतात?
=======
वैभव खूप लहान आहे. त्याला खूप मोठा उज्वल भविष्यकाळ आहे. त्याला गरज आहे ती राहुल द्रविड/ लक्ष्मण सारख्या कुंभारांची. हे दोन कुंभार या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देतील आणि त्यातून २०४७ च्या विकसित भारताच्या’ स्वप्नाला बळ देणारे पंख वैभवला लाभतील. त्याचा ‘पृथ्वी शॉ’ होऊ नये म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी त्याचे पालक पार पाडतीलच.
वैभव भविष्यात अशीच पराक्रमाची शिखरे काबीज करो व सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडीत काढो हीच सदिच्छा. ( Vaibhav Sooryavanshi )
रघुनंदन भागवत
६ फेब्रुवारी २०२६
- 15 sixes
- 175 off 80 balls
- batting records
- Bihar cricket
- cricket highlights
- Cricket News
- fastest U19 century
- Harare Sports Club
- ICC Under-19 Cricket World Cup
- India U19 champion
- India vs England U19 final
- Indian cricketer
- IPL youngest centurion
- left-handed batsman
- Player of the Match
- Player of the Tournament
- Rajasthan Royals
- record innings
- sixes record
- teenage batting sensation
- U19 World Cup 2026
- U19 World Cup final
- Vaibhav Sooryavanshi
- Vaibhav Suryavanshi