अमेरिका-इराण युद्धाला आता महिना होत आला आहे. या सर्वांत अमेरिकेने इराणला नमवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र इराणने अमेरिका, इस्रायलसह मध्यपूर्वेतील देशांनाही तोंड दिले आहे. एवढे प्रयत्न करूनही इराणमध्ये सत्तांतर होत नाही, हे पाहून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नागरिकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. जनतेने रस्त्यावर यावे, सरकारला उलथून लावावे, असे आवाहन ट्रम्प करत असले तरी इराणची जनता मात्र शांत आहे. ( IRGC )

इराणमध्ये सध्या माणसाचे जीवन सर्वांत कठीण झाले आहे. खायला अन्न नाही, जे अन्न उपलब्ध आहे ते घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. हवा आणि पाणी शुद्ध नाही. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक यातना सहन करत इराणी नागरिक राहत आहेत. पण हे लोक इराण सरकारविरोधात रस्त्यावर उतरत नाहीत. त्याला कारण ठरली आहे ती आयआरजीसीची दहशत. इराणची ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ म्हणजे दहशतीचे दुसरे नाव आहे. या आयआरजीसीने इराणमध्ये काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले आंदोलन अतिशय क्रूरपणे चिरडले आहे. याचा पुरावाही सध्या इराणच्या टीव्हीवरून दाखवण्यात येत आहे. इराणमधील खामेनी राजवटीविरुद्ध आंदोलन केल्याबद्दल तीन तरुणांना क्रेनला लटकवून सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. हा व्हिडिओ सध्या इराणमध्ये सर्वत्र दाखवण्यात येत आहे. यातील एक युवक इराणसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता. हे फक्त तीन तरुणांचे उदाहरण आहे; मात्र इराणमधील अनेक तरुण सध्या गायब आहेत. त्यांनी याच आंदोलनात भाग घेतला होता. त्यांना शोधून आयआरजीसीच्या जवानांनी ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. काहींचे हातपाय तोडण्यात आले आहेत. त्यामुळे ट्रम्प आणि इस्रायल कितीही सत्ताबदलासाठी आवाहन करत असले तरी इराणच्या जनतेच्या मनातील दहशत कमी होत नाही. ही दहशत जोपर्यंत आहे, तोपर्यंत इराणमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन होणार नाही, हे निश्चित. ( IRGC )
इराणमधील नागरिक सध्या दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. रात्रंदिवस होणारे क्षेपणास्त्रांचे हल्ले सहन करत हे नागरिक इराणमधील भडकलेल्या महागाईला तोंड देत आहेत. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राजघराण्यातर्फे सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करा, रस्त्यावर उतरा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र इराणचे नागरिक असे कुठलेही आंदोलन करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्याला कारण ठरला आहे एक व्हिडिओ.
इराणमध्ये नुकतेच सालेह मोहम्मद या १९ वर्षीय तरुणाला भर रस्त्यावर फाशी देण्यात आले. १९ वर्षीय सालेहचा गुन्हा इतकाच होता की त्याने जानेवारी महिन्यात झालेल्या सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. सालेह हा इराणच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत होता. त्याने कुस्तीच्या माध्यमातून इराणचे नाव जगभर गाजवले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असलेल्या सालेहने यापूर्वी अनेक सामन्यांमध्ये इराणचा झेंडा फडकवला होता. मात्र सरकारविरोधात काम केल्याचा ठपका ठेवून त्याला आयआरजीसीने अटक केली. त्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली. सालेहसह अन्य १८-१९ वर्षीय तरुणांवर खटला चालवण्यात आला. या तरुणांना त्यांची बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. हे क्रौर्य एवढ्यावरच थांबले नाही; या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला. सालेहला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावही दाखवण्यात आले. कैद्यांच्या वेशात बसलेला सालेह राजवटीपुढे हताश दिसत होता. नंतर अन्य दोन तरुणांसह त्याला भर रस्त्यावर फासावर लटकवण्यात आले. ( IRGC )
=======
हे देखील वाचा : Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत
=======
इराणमध्ये अशाच क्रूरपणे आंदोलन चिरडण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनात अनेक तरुण-तरुणींचा सहभाग होता. यातील काही आंदोलक कधीही त्यांच्या घरी परतले नाहीत. त्यांच्या शोधासाठी नातेवाईक हॉस्पिटल आणि शवगृहांमध्ये फेऱ्या मारत आहेत. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये इराणमध्ये आंदोलनाचा जो भडका उडाला, त्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याची माहिती आहे. एकट्या तेहरानमध्ये ३,००० हून अधिक लोक मारले गेल्याचे सांगण्यात येते. मात्र मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अहवालानुसार मृतांचा आकडा ७,००० पेक्षा जास्त आहे. एका अमेरिकन संस्थेने हा आकडा ३५ हजारांच्या घरात असल्याचे म्हटले आहे. या दडपशाहीच्या विरोधात लढणाऱ्या अनेकांना आधीच आयआरजीसीने ताब्यात घेतले आहे. शिवाय जे नागरिक आंदोलन करू इच्छित आहेत, त्यांना आता पोटापुरते अन्न मिळवण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. त्यामुळे इराणमध्ये जनता पुन्हा सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, हे सध्या स्वप्नवत वाटत आहे. ( IRGC )
— सई बने
- anti-government protests Iran
- economic crisis Iran
- fear and intimidation Iran
- human rights crisis Iran.
- Iran authoritarian regime
- Iran censorship and propaganda
- Iran human rights violations
- Iran political repression
- Iran protest suppression
- Iran public unrest
- Iran regime control
- Iran security forces brutality
- Iran youth protests
- IRGC crackdown
- Islamic Revolutionary Guard Corps
- mass arrests Iran
- Middle East political tensions
- missile attacks Iran
- protester disappearances Iran
- public executions Iran
- regime change debate Iran
- Saleh Mohammad execution
- Tehran protest deaths
- Trump call for uprising
- US Iran conflict