अमेरिका आणि इराण युद्धाला आता काही दिवसांत महिना होत आहे. सुरुवातीला अमेरिकेला दोन-तीन दिवसांत इराणला आपण नमवू, असा आत्मविश्वास होता. मात्र इराणने अमेरिकेला जमिनीवर आणले आहे. इराणसोबतच्या संघर्षाच्या पहिल्या काही दिवसांत अमेरिकेला अंदाजे ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. युद्धाच्या पहिल्या दोन आठवड्यांत इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या लष्करी तळांचेही ७५ अब्ज रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या युद्धाचा वाढता खर्च लक्षात घेता अमेरिकेच्या संरक्षण विभागाने २०० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. या सर्वात डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकलेल्या युद्धनीतीवर अमेरिकेत सडकून टीका करण्यात येत आहे. सीआयएचे माजी प्रमुख लिओन पॅनेटा यांनी इराणच्या संकटासाठी ट्रम्प जबाबदार असल्याचे सांगितले आहे. ( Donald Trump’s Special Gold Coin )

तर अनेक अर्थतज्ज्ञ अमेरिकेची वाटचाल आर्थिक मंदीकडे होत असल्याचे सूतोवाच करत आहेत. मात्र या सर्वांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्यातच मग्न आहेत. आता अमेरिकेचा २५० वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त सोन्याचे नाणे काढण्यात येणार असून त्यावर खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र छापण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी यासाठी एका नियमात बदल केला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. मात्र ट्रम्प यांनी आपल्या स्वभावानुसार सर्व टीकाकारांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेचा २५० वा वर्धापन दिन अधिक भव्यपणे साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.
अमेरिकेच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त जारी होणाऱ्या सोन्याच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र असणार आहे. खुद्द ट्रम्प यांनीच हा निर्णय घेतला असून त्यावर अमेरिकेत आता वाद सुरू झाले आहेत. कारण आपले छायाचित्र असलेले सोन्याचे नाणे काढण्यासाठी ट्रम्प यांनी १०० वर्षांचा एक नियमही मोडला आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार जिवंत राष्ट्राध्यक्षांचे चित्र चलनी नोटांवर छापण्यास परवानगी नाही. तथापि, हे विशेष नाणे असल्यामुळे ट्रम्प यांनी हा नियम पायदळी तुडवून आपले छायाचित्र असलेल्या सोन्याच्या नाण्याला परवानगी दिली आहे. या २४ कॅरेट सोन्याच्या नाण्यावर ट्रम्प व्हाईट हाऊसच्या प्रसिद्ध ‘रेझोल्यूट डेस्क’जवळ उभे असलेले दिसतील. यूएस कमिशन ऑफ फाइन आर्ट्सने या सोन्याच्या नाण्याच्या डिझाइनला मंजुरी दिली आहे. या नाण्यावर एका बाजूला १७७६ हे वर्ष आणि दुसऱ्या बाजूला २०२६ हे वर्ष छापण्यात येणार आहे. हे नाणे ३ इंच आकाराचे असणार आहे. या सोन्याच्या नाण्याव्यतिरिक्त, अमेरिकेचा वाढदिवस असलेल्या ४ जुलै रोजी सध्या चलनात असलेल्या १० सेंट (डाइम), २५ सेंट (क्वार्टर) आणि ५० सेंट नाण्यांचे डिझाइनही एका वर्षासाठी बदलले जाणार आहे. या नाण्यांवर ‘१७७६~२०२६’ या तारखा असतील. ( Donald Trump’s Special Gold Coin )
अमेरिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच एखाद्या जिवंत राष्ट्राध्यक्षांचे चित्र नाण्यावर झळकणार आहे. यापूर्वी १९२६ मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कूलिज यांचे चित्र जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यासोबत एका नाण्यावर छापण्यात आले होते. आता १०० वर्षांनंतर हा पराक्रम ट्रम्प यांच्या नावावर लिहिला जाणार आहे. या विशेष नाण्यासाठी नियमात बदल केल्यावर अमेरिकेचे कोषाध्यक्ष ब्रँडन बीच यांनी सांगितले की हे नाणे सामान्य चलनापेक्षा वेगळे आहे. ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्याकडे “प्रूफ गोल्ड कॉइन्स” जारी करण्याचे विशेष अधिकार आहेत, त्यानुसारच हे नाणे काढण्यात आल्याचे बीच यांनी स्पष्ट केले.
=======
हे देखील वाचा : Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत
=======
अर्थात, ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीकाही होत आहे. डेमोक्रॅट्सनी या निर्णयाला “लाजिरवाणा” म्हटले आहे. डेमोक्रॅट्स नेते, सिनेटर जेफ मर्कले यांनी लोकशाहीत नेते नव्हे तर हुकूमशहा नाण्यांवर आपले चित्र छापतात, अशा कठोर शब्दांत ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार बिल माहेर यांनी कायदेशीर निर्बंध टाळण्यासाठी ट्रम्प यांनी एक “कायदेशीर पळवाट” शोधली असल्याचे म्हटले आहे. काही टीकाकारांनी ट्रम्प यांना यानिमित्ताने पुन्हा जेफ्री एपस्टाईनची आठवण करून दिली आहे. त्याचेही छायाचित्र सोन्याच्या नाण्यावर छापणार का, असा प्रश्नही ट्रम्प यांना विचारण्यात आला आहे. ( Donald Trump’s Special Gold Coin )
— सई बने
- 24 karat gold coin
- America Independence 1776–2026
- Bill Maher reaction
- Calvin Coolidge 1926 coin precedent
- commemorative coin USA
- defense spending increase
- Democrat criticism Trump
- Donald Trump gold coin
- Epstein reference controversy
- Jeff Merkley statement
- July 4 celebration redesign
- living president on coin
- Pentagon budget request
- political backlash America
- presidential image on currency debate
- proof gold coin issue
- rule change controversy
- Trump portrait controversy
- US 250th anniversary
- US Commission of Fine Arts approval
- US economic concerns
- US Iran war costs
- US political symbolism.
- US Treasury decision
- White House Resolute Desk design