हॉकीमध्ये किंवा फुटबॉल मध्ये जेव्हा एखादा संघ प्रतिपाक्षाच्या गोलमध्ये चेंडू धाडण्याऐवजी स्वतःच्याच गोल मध्ये चेंडू ढकलतो तेव्हा त्याला सेल्फ’गोल’ झाला असे म्हणतात. असे सेल्फ गोल क्वचितच घडतात पण ते होतात हे सत्य आहे. काही वेळा मध्य फळीचा खेळाडू आपल्या बचावपटू कडे बॅक पास देतो तेव्हा त्याला अपेक्षित असते की बचावपटू तो चेंडू अडवून लॉंग पास देऊन प्रतिपाक्षाच्या क्षेत्रात तो चेंडू टोलवेल. पण ज्या वेळेला बचावपटू /गोलरक्षक मिळालेला बॅक पास नीट अडवू शकत नाहीत त्या वेळी तो चेंडू घरंगळत आपल्याच गोलमध्ये जातो आणि त्या संघाला कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येते. आज महाराष्ट्रात अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी (अ. प.) व राष्ट्रवादी (श. प.) यांच्या विलिनिकारणाच्या चर्चेचा जो खेळ रंगला आहे त्यात ही चर्चा चालू करून शरद पवार यांनी सेल्फ गोल केला आहे असे दिसते.

अजित पवार यांच्या अंत्य संस्कारानंतर लगेचच विलीनीकरणाची पद्धतशीर पणे चर्चा चालू करण्यात आली. त्यातच सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना न सांगता मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्याशी कुठलीही चर्चा न करता सुनेत्रा पवार यांनी कृती केली यामुळे व्यथित होऊन शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाच्या चर्चेला फोडणी देण्याचे काम केले. यात सरळ उद्देश असा होता की अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन दुफळी माजावी व अजित पवार यांचा पक्ष सुद्धा आपल्या नि यंत्रणाखाली यावा. पण प्रत्यक्षात काय घडले? दिनांक २ फेब्रुवारीला ए बी पी माझा व टीव्ही ९ या मराठी चॅनेल्सवर एक ‘इनसाईड स्टोरी’ म्हणून गौप्यस्फोट करण्याचा दावा करण्यात आला. या दाव्यानुसार अजित पवार यांच्याबरोबर जी विलीनीकरणाची चर्चा चालू होती त्यानुसार शरद पवारांचा गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून भाजप प्रणित एन. डी. ए. मध्ये सामील होणार होता.या ‘स्टोरी’ मध्ये असेही सांगण्यात आले की विलीनीकरणानंतर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद, जयंत पाटील यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद, रोहित पवार यांना राज्य मंत्री मंडळात राज्यमंत्रीपद मिळेल अशा प्रकारची व्यवस्था होणार होती. आता हे कथानक जर खरं असेल तर शरद पवार यांचे नको ते बिंग फुटले असेच म्हणावे लागेल.
हे देखील वाचा
आता शरद पवारांचे ‘इंडी’ आघाडीतील सहकारी सुप्रिया सुळे व श प.पक्षाच्या इतर खासदारांकडे संशयाने बघणार हे निश्चित. हे सर्व खासदार संसदेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना मदत करणार का? यांच्यावर विश्वास कसा ठेवावा? अशा प्रश्नांचे काहूर विरोधी काँग्रेस आघाडीत माजणार. या प्रश्नांचे मोहोळ श. प. च्या खासदारांना अस्वस्थ करणार. यातून सुटका करून घ्यायची तर या सर्व चर्चा खोट्या आहेत/निव्वळ वावड्या आहेत असे राष्ट्रवादी (श. प.) ला जाहीरपणे सांगावे लागेल. असे केले तर आपणच सुरु केलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेत तथ्य नव्हते हे आपल्याच तोंडाने कबूल करण्याची नामुष्की शरद पवारांवर येईल.थोडक्यात शरद पवार यांच्यावर’करायला गेलो एक पण झाले भलतेच’ अशी वेळ येईल. विलीनीकरणाची चर्चा चालू करण्याची घाई केली नसती तर पवारांची ‘झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली नसती का?

काँग्रेसच्या दिल्ली ‘हाय कमांडला’ शरद पवार यांच्या तिरक्या चालीची कल्पना असल्यानेच अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला कोणी दिल्लीहून आले नाहीत का? शरद पवार यांच्या अंतस्थ हे्तूंची आगाऊ कल्पना असल्यानेच सुनेत्रा पवार यांनी त्यांना न सांगता मुंबई गाठली का? या व इतर अशा अनेक सवालांचे भूत आता बाटलीतून बाहेर पडणार आहे का? अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षावर कुरघोडी करून त्यांच्या पक्षावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःवरच’सेल्फ गोल’ करून घेतला आहे हे शरद पवार यांच्या सारख्या मुरब्बी नेत्याच्या लक्षात आले नसेल का? इतरांना कात्रजचा घाट दाखवण्यात तरबेज असलेले शरद पवार स्वतःच कात्रजच्या घाटात सापडले आहेत का? काळच ठरवेल.
लेखक – रघुनंदन भागवत