जगभर युद्धाचे ढग दाटले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळपास चार वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. आता यामध्ये अमेरिका आणि इराण युद्धाची भर पडली आहे. या युद्धांमध्ये अत्यंत घातक अशा क्षेपणास्त्रांचा वापर होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा शेवट अणुबॉम्बच्या वापराने होणार, अशीही भीती व्यक्त होत आहे. या सर्वांचा पर्यावरणावर फार मोठा घातक परिणाम झाला आहे. हवामानाचे चक्रही या युद्धामुळे बदलण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या सर्वांचा घातक परिणाम म्हणजे जागतिक तापमानाच्या पातळीत वाढ होत आहे. या तापमानवाढीमुळे हिमालयातून वाहणाऱ्या हिमनद्या अधिक वेगाने वितळणार असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यासाठी युद्धासोबत जंगलतोड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन हीसुद्धा मुख्य कारणे आहेत. मैदानी प्रदेशातील काजळी बर्फावर जमा होत असून हीच काजळी सूर्याची उष्णता शोषून घेते आणि त्यामुळे बर्फ अधिक वेगाने वितळत आहे. यामुळे हिमालयातील गोठलेली जमीन देखील दरवर्षी सुमारे २० सेंटीमीटरने वितळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. या सर्वामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र ही वाढ चांगली असली तरी ती तात्पुरती आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. भविष्यात याच नद्या कोरड्या पडण्याची भीती असून त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. ( Himalayan Glaciers )

गेल्या काही वर्षांत हवामानात प्रचंड बदल होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वृक्षसंपदा तोडण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम हिमालयातील हिमनद्यांवर होत आहे. याच हिमनद्या शुद्ध पाण्याचे सर्वात महत्त्वाचे स्रोत मानल्या जातात. या हिमनद्यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. हिमालयीन प्रदेशातील हिमनद्यांचा बर्फ २००० सालापासून दुप्पट वेगाने वितळत असल्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. यासंदर्भात इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटतर्फे काही पर्यावरण तज्ज्ञ अभ्यास करीत आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून यासंदर्भात दिलेला अहवाल धक्कादायक आहे.
या अहवालानुसार, हिमालयातील हिमनद्या अशाच वेगाने वितळल्या तर २ अब्जाहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात येणार आहे. एवढी लोकसंख्या शुद्ध पाण्यासाठी हिमालयीन हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्यावर अवलंबून आहे. या हिमनद्यांना ‘आशियाचे जलस्रोत’ म्हणूनही ओळखले जाते. आता त्याच हिमनद्या दुप्पट वेगाने वितळत असून त्यांच्या या वेगात वाढ होत आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट ही काठमांडूस्थित संस्था यावर काम करीत आहे. हिमनद्यांसंदर्भातील या अभ्यासात नेपाळ, भारत, चीनसह अन्य काही देशांमधील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या सर्वांनी हिमनद्यांचे वितळणे हे मानवासाठी सर्वात धोकादायक असल्याचे सांगितले आहे. दुर्दैवाने ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असलेले हिमनद्यांचे नुकसान थांबवणे आता कोणाच्याही हातात नसल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यानंतरचा धोका काय आहे, याचा विचार आत्तापासून सुरू केला पाहिजे, असेही त्यांनी आपल्या अहवालात सुचवले आहे. ( Himalayan Glaciers )
=======
हे देखील वाचा : Population Crisis : चला प्रेमाच्या गावाला…
=======
हिंदू कुश प्रदेशातील हिमनद्यांच्या वेगाने वितळण्यामुळे भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांमध्ये पाण्याचे संकट उभे राहणार आहे. प्रामुख्याने येथील शेती उद्योगाला याचा पहिला फटका बसणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही या हिमनद्या आटल्यास संपुष्टात येणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सर्वात धोकादायक म्हणजे या हिमनद्या वेगाने वितळत असल्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. हा पाणीसाठा काहीवेळा चांगला वाटतो; मात्र हिमनद्यांच्या वितळण्याच्या वेगात आणखी वाढ झाली तर याच नद्या धोकादायक ठरणार आहेत. त्यामुळे या नदिकाठी असलेल्या गावांना, शेतीला आणि अन्य उद्योगांना धोका निर्माण होणार आहे. या नद्यांमधील पाण्याचा साठा अचानक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित देशांमध्ये यासंदर्भात आत्ताच उपाययोजना सुरू करणे गरजेचे असल्याचेही या तज्ज्ञांचे मत आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये ‘सागरमाथा’ हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठही अभ्यास करत असून हवामान बदल, पर्वतीय परिसंस्था आणि हिमनद्यांबाबत पाहणी करत आहे. ( Himalayan Glaciers )
— सई बने
- agricultural water crisis
- climate change Asia
- climate scientists warning
- deforestation impact
- environmental degradation
- environmental sustainability challenge.
- flood and drought risk
- freshwater resources Asia
- future water scarcity
- glacier melting crisis
- glacier retreat
- global warming impact
- greenhouse gas emissions
- Himalayan glaciers
- Hindu Kush region
- International Centre for Integrated Mountain Development
- Kathmandu climate research
- mountain ecosystem risk
- permafrost melting
- rising global temperatures
- river water levels rise
- soot on snow
- South Asia water crisis
- two billion people at risk
- water security threat