प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यासाठी हनुमान मंदिरांमध्ये आत्तापासूनच भजन आणि कीर्तन सोहळे सुरू झाले आहेत. या सर्वात हैदराबादमधील एका अनोख्या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हैदराबादमधील चिलकुर बालाजी मंदिर हे ‘व्हिसा बालाजी मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. हनुमानजी हे भगवान बालाजींचे परमभक्त होते. त्यामुळे या चिलकुर बालाजी मंदिरात अभिषेक, होम आणि हवन यांचे आयोजन केले जाते. भगवान हनुमानाचे भाविक जन्मोत्सवाच्या आठवडाभर आधीच येथे अखंड हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे वाचन सुरू करतात. चिलकुर बालाजी मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. या चिलकुर मंदिरात भगवान बालाजींकडे अर्ज केल्यास व्हिसा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानंतर भाविक मंदिराला १०८ प्रदक्षिणा घालतात. चिलकुर बालाजी मंदिराची व्हिसाबाबत ख्याती असल्याने भारतभरातून अनेक तरुण या मंदिरात येतात आणि भगवान बालाजींच्या चरणी लीन होतात. ही व्हिसाची कथा नेमकी कधीपासून सुरू झाली, हे जाणण्यासारखे आहे. ( Chilkur Balaji Temple )

परदेशात जाण्यासाठी नागरिक त्या देशाच्या दूतावासाकडे अर्ज करतात. मात्र भारतातील एक मंदिर असे आहे, ज्याला ‘व्हिसा मंदिर’ म्हणतात. चिलकुर बालाजी मंदिर हे तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात उस्मान सागरच्या काठावर आहे. भगवान बालाजींना समर्पित हे प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरात बालाजी म्हणून ओळखले जाणारे भगवान व्यंकटेश्वर विराजमान आहेत. हे मंदिर तेलंगणातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असून भक्त रामदास यांचे मामा अक्कन्ना आणि मडन्ना यांच्या काळात बांधले गेले. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, दरवर्षी तिरुपतीला भेट देणारा एक भक्त गंभीर आजारामुळे जाऊ शकला नाही. भगवान बालाजींचे दर्शन चुकल्यामुळे तो भाविक अस्वस्थ झाला आणि भगवान बालाजींना हाक मारू लागला. अशावेळी भगवान व्यंकटेश्वर त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी, “मी इथेच जवळच्या जंगलात आहे. तू काळजी करू नकोस,” असे सांगितले. त्यानंतर त्या भक्ताने भगवान बालाजींनी दाखवलेली जागा शोधून काढली. तिथून त्यांनी भगवान बालाजींची मूर्ती शोधून काढली. तेव्हा कुऱ्हाड चुकून भगवान बालाजींच्या मूर्तीच्या हनुवटीखाली आणि छातीवर लागली. त्या खुणा आजही भगवान बालाजींच्या मूर्तीवर असल्याचे सांगितले जाते.
या मंदिरामध्ये देवापुढे अर्ज केल्यास कुठल्याही देशाचा व्हिसा देवाच्या आशीर्वादामुळे मिळतो, अशी श्रद्धा आहे. मंदिरात आता अमेरिका, ब्रिटन किंवा कॅनडाला जाण्याचे स्वप्न पाहणारे हजारो भाविक दाखल होतात आणि व्हिसासाठी अर्ज करतात. यासाठी ज्यांना परदेशी प्रवासासाठी व्हिसा हवा आहे, ते भाविक आपले व्हिसा अर्ज हातात घेऊन गर्भगृहाला ११ वेळा प्रदक्षिणा घालतात. भाविक आपले पासपोर्टही हाती धरून असतात. असे अनेक भाविक येथे सदैव प्रदक्षिणा घालताना दिसतात. अशा भक्तांचा अर्ज भगवान बालाजींनी स्वीकारला तर त्यांचा व्हिसा मंजूर होतो. मग हे भाविक पुन्हा मंदिराला भेट देतात. यावेळी मात्र भाविक फक्त ११ प्रदक्षिणा नाही तर मंदिराभोवती १०८ प्रदक्षिणा घालतात आणि भगवान बालाजींचे आभार व्यक्त करतात. ( Chilkur Balaji Temple )
या मंदिराची व्हिसाशिवाय अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दानपेट्या नाहीत. मंदिरात कोणतीही देणगी स्वीकारली जात नाही आणि भक्तांकडून कोणताही पैसा घेतला जात नाही. याशिवाय या मंदिरात कुणाही व्हीआयपीला प्रथम प्रवेश दिला जात नाही. येथे एखादा प्रमुख नेता असो वा सामान्य विद्यार्थी, प्रत्येकाला एकाच रांगेत उभे राहावे लागते.
=======
हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती
=======
उस्मान सागर तलावाच्या काठावर असलेल्या या मंदिराचा परिसर आता विकसित करण्यात आला आहे. याशिवाय चिलकुरमध्ये एक राष्ट्रीय हरिण उद्यानसुद्धा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. विशेषतः तिरुपतीला जाऊ न शकणारे भाविक या मंदिराला भेट देतात. आता या मंदिरात महाबली हनुमानांच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ( Chilkur Balaji Temple )
— सई बने
- 108 pradakshina
- 11 circumambulations
- Akkanna Madanna history
- Chilkur Balaji Temple
- devotional practices
- Hanuman Chalisa recitation
- Hanuman devotees
- Hanuman Jayanti celebrations
- Hindu pilgrimage India
- Hyderabad temples
- Indian religious traditions
- Lord Balaji
- Lord Venkateswara
- no VIP darshan policy
- Osman Sagar lake
- passport and visa blessings
- Rangareddy district
- sacred pilgrimage site.
- spiritual tourism India.
- Sundarakanda chanting
- Telangana heritage
- temple without donation box
- Tirupati alternative temple
- visa prayer ritual
- Visa Temple Hyderabad