उत्तराखंडची चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून १९ तारखेला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडणार आहेत. त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. या चारधाम यात्रेची सुरुवात गंगोत्री धामपासून होणार असून गंगोत्री आणि यमुनोत्री येथे चारधाम यात्रा समितीतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. या मंदिरांचे परिसर फुलांनी सजवण्यात येत असून यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. २०२५ मध्ये चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ५१ लाखांपेक्षा अधिक होती. यावर्षी या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून त्याला देशातील भाविकांसह परदेशी भाविकांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या वर्षीच्या चारधाम यात्रेसाठी विक्रमी संख्येने भाविक येतील, असा अंदाज आहे. गंगोत्री येथे माता गंगा पृथ्वीवर अवतरली, असे मानले जाते. तर यमुनोत्री हे माता यमुनेचे उगमस्थान आहे. या दोन्ही पवित्र स्थानांवर १९ रोजी सुरू होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ( Chardham Yatra )

चारधाम यात्रेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या उत्तराखंडमधील चारधामचे दरवाजे उघडणार आहेत. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला विशेष महत्त्व आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधामच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. यापैकी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ रोजी भाविकांसाठी खुले होणार आहेत. यानंतर, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. बद्रीनाथ धामचे दरवाजे २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:१५ वाजता उघडतील. येथे भगवान विष्णूच्या नर-नारायण स्वरूपाचे निवासस्थान आहे. बद्रीनाथ धाम हे पृथ्वीवरील वैकुंठ मानले जाते. येथे भगवान विष्णूंनी मानवजातीच्या कल्याणासाठी तपश्चर्या केल्याची कथा आहे. बद्रीनाथ हे भगवान विष्णूच्या १०८ पवित्र मंदिरांपैकी एक आहे. भगवान विष्णूच्या भक्तांसाठी या मंदिराला विशेष महत्त्व आहे. ( Chardham Yatra )
बद्रीनाथ हे पंच बद्री मंदिरांचा एक भाग आहे. यात योगध्यान बद्री, भविष्य बद्री, आदि बद्री आणि वृद्ध बद्री यांचा समावेश आहे. स्कंद पुराणात बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख बद्रीकाश्रम म्हणून आढळतो. असे मानले जाते की, भगवान विष्णूंनी येथे तपश्चर्या केली होती आणि देवी लक्ष्मीने त्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी एका बद्री वृक्षाखाली आश्रय दिला होता. आठव्या शतकात, आदि शंकराचार्यांनी बद्रीनाथ मंदिराची पुनर्स्थापना केली. या मंदिराला भेट दिल्याने सर्व पापांचे क्षालन होते, असा भाविकांचा विश्वास आहे. उत्तर भारतात असलेले केदारनाथ मंदिर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. केदारनाथ धाम मंदाकिनी नदीवर वसलेले असून ते समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर आहे. या भागाचे ऐतिहासिक नाव “केदार खंड” आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडच्या चारधाम आणि पंच केदारांपैकीही एक भाग आहे. शिवाय, केदारनाथ हे भारतातील भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. असे मानले जाते की, जो कोणी केदारनाथ धामाला भेट देतो, तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. ( Chardham Yatra )
=======
हे देखील वाचा : Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये
=======
चारधाममधील गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही चारही स्थळे हिंदू धर्मासाठी पावन आहेत. स्कंद पुराणानुसार, जे भाविक चारधाम यात्रा करतात, त्यांना विचार, शब्द आणि कृतीतून केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त मिळते. हिमालयाच्या कुशीतील या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. धार्मिक ग्रंथ आणि आख्यायिकांनुसार, या तीर्थक्षेत्राची परंपरा थेट द्वापर युग आणि महाभारत युद्धाशी जोडलेली आहे. ८ व्या शतकात, आदि शंकराचार्यांनी केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून स्थापित केले. त्यांनी चारधाम यात्रेचे आयोजन करून तिला देशभरात लोकप्रिय केले. आता येथील सरकारही या यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे उत्तराखंडच्या पर्यटनातही मोठी वाढ झाली आहे. ( Chardham Yatra )
सई बने…
- Adi Shankaracharya
- Akshaya Tritiya
- badrinath temple
- char dham yatra
- Gangotri Dham
- Goddess Ganga
- Goddess Yamuna
- Himalayan shrine
- Hindu pilgrimage
- Jyotirlinga
- kedarnath Temple
- Lord Shiva
- Lord Vishnu
- Mandakini River
- moksha belief
- online registration
- Panch Badri
- Panch Kedar
- pilgrim rush
- Religious tourism
- sacred pilgrimage route.
- Spiritual Journey
- temple doors opening
- Uttarakhand pilgrimage
- Yamunotri Dham