उत्तर प्रदेशामध्ये भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांच्या स्थापनेमागे पौराणिक कथा आहे. असेच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात आहे. येथील ओयल या गावात असलेले भगवान शंकराचे मंदिर नर्मदेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची रचना अद्भुत आहे. हे जगातील एकमेव मंदिर आहे, जे बेडकाच्या पाठीवर उभारलेले आहे. त्यामुळे या मंदिराला बेडूक मंदिर म्हणूनही ओळखले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात भगवान शंकरासोबत बेडकाचीही पूजा केली जाते. सोबतच या अनोख्या मंदिरात उभ्या नंदीची मूर्ती आहे. नर्मदेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग हे चमत्कारी म्हणून पूजले जाते. कारण या शिवलिंगाचा रंग बदलतो, असे भाविक सांगतात. तसेच हे चमत्कारी मंदिर मंडूक तंत्रावर आधारित असल्याचीही आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराची वास्तुकला कपिलातील एका महान तांत्रिकाने साकारली असल्याचे स्थानिक सांगतात. एकूण नर्मदेश्वर महादेव मंदिराची अनेक वैशिष्ट्ये असून येथे येणाऱ्या भाविकांना भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळतो आणि धन, धान्य व आरोग्याची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. ( Narmadeshwar Mahadev Temple )

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ओयल गावात असलेल्या या मंदिरात सध्या पवित्र चैत्र महिन्यानिमित्त भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. हे नर्मदेश्वर महादेव मंदिर अनेक चमत्कारांसाठी ओळखले जाते. मुळात या मंदिराची उभारणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर राजस्थानी वास्तुकलेनुसार बांधलेले आहे. एकेकाळी हे नर्मदेश्वर महादेव मंदिर ओयल पंथाचे प्रमुख केंद्र होते. या मंदिराची उभारणी झाली तेव्हा या मंदिराच्या शिखरावर एक भव्य छत्री होती, असे सांगितले जाते. ही छत्री सूर्यासोबत फिरायची. नर्मदेश्वर महादेव मंदिर हे अशाच अनोख्या आख्यायिकांसाठी ओळखले जाते. कारण या महादेव मंदिरातील शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलत असल्याचे सांगितले जाते. हे शिवलिंग नर्मदा नदीतून प्राप्त झालेले आहे. या चमत्कारी शिवलिंगाच्या बदलणाऱ्या अनोख्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात. दिवसातून तीनही वेळा रंग बदलणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर भगवान महादेव भाविकांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करतात, अशीही श्रद्धा आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान महादेवाचे वाहन असलेल्या नंदीमहाराजांची उभी मूर्ती आहे. इतर सर्व मंदिरांमध्ये नंदीमहाराज भगवान महादेवासमोर बसलेल्या स्थितीत असतात; मात्र या एकमेव मंदिरात नंदीमहाराजांची उभी मूर्ती आहे.
नर्मदेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेव, नंदीमहाराज यांच्यासोबत बेडकाचीही पूजा मानाने केली जाते. कारण नर्मदेश्वर महादेव मंदिर मंडूक तंत्र मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर या भागातील ओयल संस्थानाच्या राजाने १८६० ते १८७० दरम्यान बांधले. मंदिराची उभारणी विशाल बेडकाच्या आकृतीच्या मागे १८ × २५ चौरस मीटर क्षेत्रफळावर करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला, तर दुसरे प्रवेशद्वार दक्षिणेला आहे. बेडकाच्या पाठीवर श्री यंत्रासारखा अष्टकोनी चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्याही आहेत. या मंदिराच्या गर्भगृहात विशाल कलश असून त्यावर कमळांची नक्षी कोरलेली आहे. यामध्येच नर्मदेश्वर शिवलिंग विराजमान आहे. हे मंदिर संतुलन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. या नर्मदेश्वर महादेव मंदिरात ध्यान-धारणा करण्यासाठी अनेक भाविक येतात. वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही या मंदिराला आवर्जून भेट देतात. विशेषतः मंदिराच्या बांधणीचा अभ्यास करणारे जिज्ञासू या मंदिराला भेट देऊन हे मंदिर बेडकाच्या पाठीवर कशाप्रकारे उभारले आहे, याचा अभ्यास करतात. ( Narmadeshwar Mahadev Temple )
=======
हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती
=======
या मंदिरातील महाशिवरात्र हा सर्वात मोठा सोहळा असतो. त्यासाठी तब्बल आठवडाभर येथे मेळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी मंदिराच्या सजावटीसाठी पांढऱ्या फुलांचा वापर करण्यात येतो. सोबतच दिवाळीच्या पहिल्या दिवशीही येथे भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी शिवलिंगाचे तीन रंगांतील दर्शनही शुभ मानले जाते. संपूर्ण उत्तर प्रदेशमधून येथे भाविक येतातच; सोबत अन्य राज्यांतून येणाऱ्या भाविकांचीही संख्या वाढली आहे. अलिकडच्या काळात येथे काही हॉटेल्सही उभारण्यात आली असून त्यामुळे भाविकांच्या निवासाची सोय झाली आहे. ( Narmadeshwar Mahadev Temple )
— सई बने
- ancient temple history
- Chaitra month celebrations
- color-changing Shivling
- devotees’ faith and beliefs
- frog temple India
- Hindu mythology temples
- Indian religious tourism
- Indian temple architecture
- Lakhimpur Kheri temple
- Mahashivratri festival
- Manduk Tantra temple
- miraculous religious sites
- miraculous Shiva temple
- Narmada Shivling
- Narmadeshwar Mahadev Temple
- Oel village Uttar Pradesh
- positive energy temples
- Rajputana architectural style
- sacred pilgrimage destination.
- sacred Shiva worship
- spiritual pilgrimage India
- standing Nandi statue
- temple legends India
- unique Hindu temples
- Vastu architecture study