मनुष्याला त्याचा जीवन प्रवास करताना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी काही अडचणींचा सामना करताना त्याला कमी त्रास होतो, मात्र काही अडचणींवर मात करण्यासाठी त्याला कोणाच्यातरी मार्गदर्शनाची, मदतीची गरज असते. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन कायम मनुष्याला योग्य मार्ग तर दाखवतेच सोबतच काय योग्य काय अयोग्य, काय करावे काय करू नये याचे देखील ज्ञान देते. आपल्या घरातील, ओळखीची मंडळी अनेकदा आपल्याला त्यांचे अनुभव सांगत असतात. मात्र कधी कधी अशी वेळ येते जेव्हा अतिशय महान, विचारवंत, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक असते, तेव्हा आठवतात ते आचार्य चाणक्य.
आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि महान शिक्षक होते, ज्यांनी मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी ‘अर्थशास्त्र’ हा राजकारणावरील ग्रंथ आणि ‘चाणक्य नीती’ द्वारे जीवन, व्यापार व यशासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. याच चाणक्य यांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर त्याचा तुमच्या जीवनावर नक्कीच सकारत्मक परिणाम होईल. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया.
झालेल्या दिवसाचा विचार करा
आचार्य चाणक्य त्यांच्या धोरणात सांगतात की जो व्यक्ती आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो तो आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. तुम्ही दिवसभरात काय केले याची तुमच्याकडे दररोजची नोंद असली पाहिजे. रात्री झोपायला जाताना, तुमचा दिवस कसा गेला याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही कोणत्या चुका केल्या त्यातून तुम्ही काय शिकलात आणि दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकला असता? याचा विचार करून तुम्ही येणाऱ्या नवीन दिवसासाठी चांगले नियोजन करू शकाल.
वाचन करा
झोपण्यापूर्वी थोडा वेळ पुस्तकं वाचा. किमान अर्धा तास किंवा कमीत कमी वीस मिनिटे एखादे चांगले पुस्तक वाचा. आचार्य चाणक्य सांगतात की ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. पुस्तकं ज्ञानाचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे चांगल्या पुस्तकांचे वाचन नक्कीच तुम्हाला सर्वोत्तम ज्ञान मिळवून देईल.

दिवस सकारात्मक विचाराने संपवा
रात्री झोपताना कधीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही रात्री काहीतरी नकारात्मक विचार करता तेव्हा गोष्टी आणखी नकारात्मक होऊ लागतात. म्हणून दिवसाचा शेवट नेहमी आनंदी ठेवा. झोपण्यापूर्वी काहीतरी सकारात्मक विचार करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ रहा. अशा प्रकारे तुम्हाला चांगली झोप येईल आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही सकारात्मक असेल.
दुसऱ्या दिवसाचे नियोजन करा
उद्याचा नवीन दिवस आजपेक्षा अधिक चांगला आणि फलदायी बनवण्यासाठी आधीच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी येणारा दिवस कसा घालवायचा आहे याची एक रूपरेषा मनात तयार करा. दिवसासाठी काही विशिष्ट गोष्टी निश्चित करा. सकाळी काय करावे आधीच निर्णय घ्या. यामुळे तुमचा वेळ तर वाचेल, पण तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने नक्कीच पूर्ण होईल.
ध्येयाचा विचार करा
ध्येयाचा विचार करणे हे आचार्य चाणक्य यांनी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या धोरणात स्पष्ट केले होते. आचार्य चाणक्य सांगतात की माणसाचे मन नेहमी त्याच्या ध्येयावर केंद्रित असले पाहिजे. ज्याच्यासमोर स्पष्ट ध्येय असते तो भविष्यात कधीही भरकटत नाही आणि त्याला नक्कीच यश मिळते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ध्येयाबद्दल काही वेळ विचार करा. तुमचे ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. या गोष्टी तुम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रेरित करतील.
========
7 Hours Sleep : 7 तासांची झोप म्हणजे ‘नवीन डाएट’ ?
========
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांनी उशिरापर्यंत जागे राहण्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट केले की रात्री उशिरापर्यंत जागे राहू नये, अन्यथा अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. चाणक्य यांच्या मते, उशिरापर्यंत जागे राहू नये कारण त्यामुळे ताण येऊ शकतो. यामुळे केवळ नकारात्मक विचारच नाही तर निरर्थक विचार देखील येऊ शकतात. यामुळे चिंता निर्माण होते. उशिरापर्यंत जागे राहणे देखील टाळले पाहिजे कारण यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. शिवाय, एखाद्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics