इराणमध्ये सत्तांतर करून इराणच्या जनतेला स्वतंत्र करणार हे ध्येय ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर युद्ध सुरू केले. इराणमध्ये युरेनियमचा साठा आंतरराष्ट्रीय नियमांहून अधिक आहे, इराण कधीही अणुबॉम्ब तयार करणार आणि हे जगासाठी घातक आहे, अशी कारणे देत ट्रम्प यांनी इराणला युद्धाच्या मैदानात ओढले. सर्वात पहिला घाव घालत अमेरिकेने इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामोनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना आणि इराणच्या पहिल्या घडीतील अधिकाऱ्यांना एकसाथ मारण्यात यश मिळवले. इराणमध्ये विनाशक क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू केला. इराणची राजधानी तेहरानमधील तेलसाठ्यांना आगी लावल्या. परिणामी तेथे काळे ढग सर्वदूर पसरले असून काळ्या रंगाचा रसायनांचा अंश असलेला पाऊस पडत आहे. ही सर्व परिस्थिती ट्रम्प यांच्या अट्टाहासामुळे झाली आहे. अयातुल्ला खामोनी यांच्या निधनानंतर अनेक तज्ञांनी ट्रम्प यांना आता इराण युद्धातून माघार घ्या, असा सल्ला दिला. मात्र ट्रम्प यांनी त्याला नकार दिला. तसेच आपले लक्ष जोपर्यंत साध्य होत नाही, तोपर्यंत इराणवरील हल्ले थांबवणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे ट्रम्प यांचे लक्ष नेमके काय आहे, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. ट्रम्प यांची नजर इराणमधील तेलाच्या साठ्यांवर आहे. त्यांना इराणच्या खार्ग बेटाचा ताबा हवा आहे. या बेटावरूनच इराणची सर्व तेलाची निर्यात होते. हे बेट ताब्यात आल्यास तेलाच्या व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित करता येईल, या हेतूनेच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला सुरू केला आहे. त्यांच्या या हव्यासापोटी अवघ्या जगामध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवत आहे. ( Iran’s Kharg Island )

डोनाल्ड ट्रम्प हे इराणवरील युद्धात फसल्याचे सध्याचे चित्र आहे. इराणबरोबर युद्ध करण्यात ट्रम्प यांनी घाई केलीच, शिवाय इराणची सैन्य ताकद आणि तयारी किती आहे, याचा अंदाज घेण्यात त्यांची चूक झाली, हे आत्तापर्यंतच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. ट्रम्प एकीकडे इराणची सर्व यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करत असतानाच इराणमधून आता क्लस्टर बॉम्बचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांची योजना कुठे फसली याचा विचार होत असतानाच खार्ग बेटाचा उल्लेख येऊ लागला आहे. ९० टक्के इराणमधील तेलाची निर्यात याच खार्ग बेटामधून होते. या खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असून त्याच हव्यासापोटी त्यांनी युद्ध सुरू केले आणि आता अवघ्या जगामध्ये तेलाचा तुटवडा सुरू झाला आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या खार्ग बेटाचे महत्त्व अचानक वाढले आहे. इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात याच खार्ग बेटावरून होते. इराणमधील तेल उद्योगाचे हृदय म्हणून खार्ग बेटाचा उल्लेख केला जातो. इराणच्या अहवाज, मारौन आणि गचसारन यांसारख्या प्रमुख तेल क्षेत्रांमधून पाइपलाइन थेट खार्ग बेटापर्यंत जातात. येथे तेल मोठ्या साठवण टाक्यांमध्ये साठवले जाते आणि नंतर टँकर जहाजांवर लोड करून जगभरातील विविध देशांमध्ये पाठवले जाते. खार्ग बेट हे जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी तेल मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे. मोठे तेल टर्मिनल, पाइपलाइन, साठवण टाक्या आणि जहाज लोडिंग सुविधा अशा साधनांनी हे बेट सुसज्ज आहे. या बेटावर रोज ७ दशलक्ष बॅरल तेल जहाजांमध्ये भरण्याची सुविधा आहे. या बेटावर अंदाजे ३० दशलक्ष बॅरल तेल साठवण्याची क्षमता आहे. सध्या अंदाजे १८ दशलक्ष बॅरल तेल साठवणुकीत असल्याचा अंदाज आहे, जे सामान्य परिस्थितीत १० ते १२ दिवसांच्या निर्यातीइतके आहे. १९६० च्या दशकात इराणमध्ये तेलाचे महत्त्व वाढू लागल्यावर खार्ग बेटाचा विकास सुरू झाला. या खार्ग बेटावर कब्जा मिळाला तर इराणवर आर्थिक पकड मिळवता येईल, हे जाणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला सुरू केल्याचे आता स्पष्ट होत आहे. ( Iran’s Kharg Island )
अमेरिका खार्ग बेटाबाबत किती उत्सुक आहे, याची पावती म्हणजे आत्तापर्यंत इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणच्या अणुतळांवर हल्ला केला आहे, मात्र खार्ग बेटाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली होती. खार्ग बेट अमेरिकेच्या ताब्यात आल्यास इराणमधील सर्वच तेल उत्पादनावर वर्चस्व प्रस्थापित करता येणार आहे. पण आता इराणकडून वाढत असलेला प्रतिसाद पाहता अमेरिका या खार्ग बेटावरही हल्ला करण्याचा विचार करत आहे. जर खार्ग बेटावरील तेल टर्मिनल नष्ट केले तर इराणच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत बंद होणार आहे. तेल विक्री ही इराणी सरकार आणि त्याच्या लष्करासाठी सर्वात मोठी आर्थिक मदत आहे. जर हे उत्पन्न बंद झाले तर इराणला दीर्घकाळ युद्ध टिकवणे कठीण होऊ शकते.
=======
हे देखील वाचा : United States-North Korea : युद्धात फक्त याचीच कमी होती….
=======
वास्तविक खार्ग बेटावर अमेरिकेचा फार पूर्वीपासून डोळा आहे. खार्ग बेटाचा विकास १९६० च्या दशकात सुरू झाला आणि त्यात अमेरिकेची मोठी भूमिका होती. अमेरिकन तेल कंपनी अमोकोने येथे आधुनिक तेल निर्यात टर्मिनल बांधले. मात्र १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेने इराणमधून माघार घेतली. तेव्हाच इराण ओलिस संकटादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांना बेट ताब्यात घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांनी तसे केले नाही. १९८० च्या दशकात राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात अमेरिकेने इराणच्या इतर अनेक तेल सुविधांवर हल्ला केला, परंतु खार्ग बेटावर हल्ला करण्यात आला नाही. आता ट्रम्प याच खार्ग बेटासाठी ठाम आहेत. खार्ग बेटाचा विकास अमेरिकन तेल कंपन्यांनी कधीकाळी केला असल्यामुळे या बेटावर अमेरिकेचाच हक्क असल्याची त्यांची भूमिका आहे. अमेरिकेच्या या हुकूमशाही वृत्तीमुळेच आज अवघ्या जगाची होरपळ सुरू आहे. ( Iran’s Kharg Island )
– सई बने
- Ayatollah Khamenei
- cluster bombs
- crude oil supply
- donald trump
- Economic Sanctions
- energy geopolitics
- geopolitical tensions
- global energy crisis
- global oil shortage
- Hormuz Strait
- international oil markets
- Iran war
- Kharg Island
- Middle East conflict
- military escalation
- oil exports
- oil infrastructure
- oil terminals
- petroleum trade dominance
- regime change agenda
- strategic oil hub
- Tehran oil depots
- United States
- us foreign policy