राजस्थान राज्यातील सिकर जिल्ह्यातील खाटू गावामध्ये असलेल्या खाटूश्याम मंदिरामध्ये सध्या फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील भाविकांचाही मोठा मेळा भरला आहे. हे मंदिर महाभारतातील बर्बरिक यांना समर्पित आहे. बर्बरिक हे महाभारतातील अजिंक्य योद्धा, घटोत्कचाचे पुत्र आणि भीमाचे नातू होते. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात ‘श्याम’ म्हणून पूजा होईल, असा आशीर्वाद दिला होता. खाटूश्यामबाबा मंदिर म्हणून येथे आता भगवान खाटूश्याम यांची पूजा होते. “हारे का सहारा, खाटू श्याम बाबा…” म्हणत रोज हजारो भाविक खाटूश्यामबाबांच्या चरणी लीन होतात. मात्र सध्या येथे मेळा सुरू असल्यामुळे दररोज लाखो भाविक मंदिर परिसरात दाखल होत आहेत. राजा रूपसिंग चौहान आणि त्यांची पत्नी नर्मदा कंवर यांनी इ.स. १०२७ मध्ये बांधलेल्या या विशाल मंदिराची ख्याती फक्त देशातच नाही तर विदेशातही आहे. कलियुगाचा अवतार म्हणून खाटूश्यामबाबांची पूजा करण्यात येते. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या एकादशीला खाटू श्याम मंदिरात हा भव्य मेळा भरतो. यावर्षी फाल्गुनी मेळा २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होत असून, यापैकी २७ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक भाविक खाटूश्यामबाबांच्या चरणी येण्याची अपेक्षा आहे. ( Khatu Shyam Temple )

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध खाटूश्यामबाबांचा मेळा सुरू झाला आहे. या मेळ्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. या उत्सवात खाटूश्यामबाबांची विविध फुलांनी आरास करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधूनही गुलाबाची फुले येथे आणली जात आहेत. यावर्षी मंदिर सजवण्यासाठी पश्चिम बंगालमधील १२० तज्ञ कारागीर आणण्यात आले आहेत. दुर्गापूजेसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य पंडालांचा अनुभव असलेल्या या कलाकारांनी खाटूश्यामबाबांच्या मंदिरात अनोखी सजावट केली आहे. मंदिर संकुलात भगवान श्रीकृष्ण आणि राधा तसेच काली माता आणि बालाजी महाराज यांच्या रासलीलेचे आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या सजावटीतील मुख्य आकर्षण म्हणजे भगवान शंकरांचे विशाल डमरू आणि ऐरावत हत्तीची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ( Khatu Shyam Temple )
लाखो भाविक रिंगसहून खाटूश्यामबाबांचे दर्शन घेण्यासाठी पायी प्रवास करत आहेत. या भाविकांसाठी संपूर्ण मार्गावर पाणी, जेवण यांसह आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगस ते खाटू या दरम्यान १७ किलोमीटर लांबीचा समर्पित पादचारी कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे. हा मार्ग पूर्णपणे वाहनमुक्त आहे. पार्किंगमधून भाविकांना सुविधा देण्यासाठी ई-रिक्षांचा वापर केला जात आहे. ही सर्व व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मेळ्यात लाखो भाविक येत असल्यामुळे मंदिर समिती आणि प्रशासनाने व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. मंदिर परिसरातील गर्दी नियोजनासाठी १४ स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या आहेत. या रांगांपर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे २३ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. सुरक्षेसाठी ५,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी, ड्रोन कॅमेरे आणि ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत.
या मेळ्याचा सर्वात मोठा दिवस फाल्गुन शुक्ल एकादशी, २७ फेब्रुवारी हा असेल. मंदिर समिती २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भव्य रथयात्रा आयोजित करणार आहे. ही रथयात्रा मंदिरापासून सुरू होऊन प्रमुख रस्त्यांवरून फिरणार आहे. खाटूश्यामबाबांचा हा चांदीचा रथ असून, त्यावर विराजमान झालेल्या खाटूश्यामबाबांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या मेळ्यासाठी सुमारे ३५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. ( Khatu Shyam Temple )
=======
हे देखील वाचा : Shimga : कोकणचो शिमगो…कोकणातील पालखी परंपरा
=======
खाटूश्यामबाबांना “हारे का सहारा” असे म्हटले जाते. त्यामागे भगवान श्रीकृष्णांनी दिलेले वरदान आहे. भीमाचे नातू असलेल्या बर्बरिक यांनी आपल्या आईला वचन दिले होते की, युद्धात जो पराभूत होईल त्याला ते पाठिंबा देतील. परंतु यामुळे युद्ध कोणीच जिंकू शकणार नाही, हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याकडे त्यांचे मस्तक दान म्हणून मागितले. बर्बरिक यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले मस्तक भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या या त्यागाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सिकर जिल्ह्यातील खाटू धाम येथे कलियुगातील ‘श्याम’ म्हणून पूजले जाण्याचे वरदान दिले. बर्बरिक यांचे मस्तक राजस्थानातील खाटू गावातील एका तलावात प्रकट झाल्याचे मानले जाते. राजा रूपसिंग चौहान यांनी इ.स. १०२७ मध्ये येथे मंदिर बांधले. आजही येथे बर्बरिक यांची खाटूश्यामबाबा म्हणून पूजा केली जाते. ( Khatu Shyam Temple )
– सई बने
- 35 lakh pilgrims
- Barabarika head sacrifice.
- Barbarika legend Mahabharata
- Bhima grandson story
- CCTV monitoring network
- drone surveillance system
- Ekadashi celebration February
- floral temple decoration
- grand religious festival
- Haare Ka Sahara
- high security arrangements
- international devotees attendance
- Kaliyuga Shyam worship
- Khatu shyam temple
- Lord Krishna blessing
- massive devotional gathering
- pedestrian corridor 17 km
- Phalguni fair Rajasthan
- Rajasthan religious tourism
- Ringas to Khatu walk
- Sikar district pilgrimage
- silver chariot procession
- spiritual pilgrimage journey
- VIP darshan बंद
- West Bengal artisans