मेक्सिकोमधील सर्वात कुख्यात ड्रग्ज माफियांचा राजा आणि मिचोआकान प्रांतातील रहिवासी असलेला ५९ वर्षीय नेमेसियो ओसेगुएलाने गेल्या तीन दशकांपासून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून अवघ्या मेक्सिकोला आपल्या ताब्यात घेतले होते. या कुख्यात ड्रग्ज माफियाला ‘एल मेंचो’ या नावाने ओळखले जायचे. याच एल मेंचोचा जलिस्को येथे लष्करी कारवाईदरम्यान मृत्यू झाला. एल मेंचो चकमकीत जखमी झाला आणि हेलिकॉप्टरने नेत असताना त्यातच त्याचा मृत्यू झाला, ही बातमी येताच अवघ्या मेक्सिकोमध्ये जाळपोळ सुरू झाली. ( El Mencho )
सीजेएनजी टोळीने ग्वाडालजारा, प्यूर्टो वल्लार्टा सारख्या शहरांसह मेक्सिकोच्या अनेक राज्यांमध्ये सरकारी मालमत्तेवर हल्ले सुरू केले. याचा फटका प्यूर्टो वल्लार्टा येथील पर्यटकांनाही बसला असून येथे हजारो परदेशी पर्यटक अडकले आहेत. अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली असून शाळा-महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली आहे. सरकारने लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले असून अमेरिकन आणि भारतीय दूतावासांनीही त्यांच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यासर्वांमध्ये जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलच्या माध्यमातून एल मेंचोने वर्षानुवर्षे ड्रग्ज तस्करी करून अगणित संपत्ती जमवली आहे. त्या संपत्तीवर आणि त्याच्या कार्टेलवर आता कुणाचे वर्चस्व राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

मेक्सिकोमध्ये जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल म्हणजेच सीजेएनजीचा नेता आणि मेक्सिकोचा सर्वात भयानक ड्रग्ज माफिया मारला गेला आहे. एल मेंचो हा अतिशय क्रूर माफिया होता. असा कुठलाही वाईट धंदा नाही, जो एल मेंचोने केलेला नाही, अशीच त्याची ओळख होती. अमेरिकेने एल मेंचोवर १३६ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मात्र हा क्रूरकर्मा मारला गेल्यानंतर त्याच्या कार्टेलमधील गुंडांनी अवघ्या मेक्सिको शहराला वेढा घातला आहे. सर्वत्र आगीच्या घटना घडत आहेत. सरकारी कार्यालयांना आग लावली जात आहे. काही मॉलही पेटवण्यात आल्याची बातमी आहे. मेक्सिकोतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. रस्त्यावर दिसेल ती गाडी एल मेंचोचे गुंड पेटवत असल्यामुळे अवघ्या मेक्सिकोमध्ये रबर जळल्याचा वास पसरल्याची माहिती आहे. ( El Mencho )
एल मेंचोच्या मृत्यूनंतर हा आगडोंब का पसरला, हे जाणून घेण्यासाठी आधी एल मेंचो कोण होता आणि त्याने अवघ्या मेक्सिकोसह जगभर ड्रग्जचे साम्राज्य कसे उभे केले होते, ते पाहूया. एल मेंचोचा जन्म १७ जुलै १९६६ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. पाचवीपर्यंत त्याचे शिक्षण झाले. १४ वर्षांच्या वयापासून एल मेंचोने गांजाच्या शेतांचे रक्षण करण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्याला पैसे कमवण्याचा मार्ग मिळाला. १९८० च्या दशकात तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये स्थायिक झाला. मात्र ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याला अटक झाली आणि १९९२ मध्ये हेरॉइन विकल्याबद्दल त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली. नंतर त्याला मेक्सिकोला परत पाठवण्यात आले.
यानंतर त्याने मेक्सिकोच्या पोलीस खात्यात नोकरी मिळवली. येथून त्याने कायद्यातील सर्व खाचाखुचा शिकून घेतल्या. अवघ्या दोन वर्षांत त्याने पोलीस नोकरीचा राजीनामा दिला आणि तो पूर्णपणे ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात उतरला. तो प्रथम मिलेनियो कार्टेलमध्ये सामील झाला. २००९-२०१० च्या सुमारास एल मेंचोने स्वतःचे जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल स्थापन केले. त्यातून त्याने कोकेन, हेरॉइन, मेथाम्फेटामाइन आणि विशेषतः फेंटानिलची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली. सीजेएनजीने अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेत आपले नेटवर्क वाढवले. या ड्रग्जमधून मिळालेल्या अमाप पैशांतून त्यांनी अनेक आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी केली. मेक्सिकोच्या लष्करापेक्षा अधिक हेलिकॉप्टर एल मेंचोने खरेदी केले, एवढी त्याची संपत्ती आणि ताकद वाढली. ( El Mencho )
=======
हे देखील वाचा : Theravada Buddhist monks : फक्त शांतीसाठी…..
=======
२०१५ मध्ये सीजेएनजीने मेक्सिकन आर्मीचे हेलिकॉप्टर पाडले आणि त्यात नऊ सैनिक ठार झाले. त्यानंतर अमेरिकन सरकारने त्याच्या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले आणि त्याच्यावर १५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले. एल मेंचोला यापूर्वी दोन वेळा पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याच्याभोवती असलेल्या अभेद्य सुरक्षा व्यवस्थेमुळे तो दोन वेळा थोडक्यात बचावला. अखेर २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मेक्सिकन आर्मीच्या स्पेशल फोर्सेस आणि नॅशनल गार्डने त्याला ठार केले. यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने मोठी मदत केली. या लष्करी कारवाईदरम्यान एल मेंचोच्या माणसांनीही गोळीबार केला, ज्यात काही सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्याच्या कार्टेलमधील सदस्यांनी मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुरू केली. त्यामुळे अवघे मेक्सिको बंद झाल्यासारखे झाले आहे.
एल मेंचोच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे. एल मेंचोची पत्नी रोसालिंडा गार्सिया असून त्याला तीन मुले आहेत. त्याची संपत्ती किमान ४,२०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. मेक्सिकन सरकारच्या मते, कार्टेलची एकूण मालमत्ता रिअल इस्टेट, व्यवसाय आणि मनी लॉन्डरिंगद्वारे लपवली गेली आहे. एल मेंचोच्या मृत्यूनंतर ही सर्व संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. ( El Mencho )
एल मेंचोची पत्नी ‘ला जेफा’ही चर्चेत आली आहे, कारण तिच्या नावावर यापेक्षाही दुप्पट संपत्ती असल्याची माहिती आहे. तिलाही दोन वेळा अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ला जेफा कुठे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. त्यांचा मोठा मुलगा रुबेन ओसेगुएरा गोंझालेझ याला २०२४ मध्ये ड्रग्ज तस्करी आणि शस्त्रास्त्रांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो अमेरिकन तुरुंगात आहे. एल मेंचोची ३९ वर्षांची मुलगी ‘ला नेग्रा’ हिनेही वडिलांना ड्रग्जच्या धंद्यात मदत केली होती. तिला २०२० मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली. सध्या तिची सुटका झाली असली तरी तिचे गुन्हेगारी संबंध असल्याचा संशय आहे. एल मेंचोची धाकटी मुलगी लैशा ओसेगुएरा सध्या अमेरिकेत राहते. तिच्याबद्दल फारशी माहिती नसली तरी ती कार्टेलशी जोडलेली असल्याचा संशय आहे. याशिवाय ‘एल पेलोन’ नावाचा मुलगाही असल्याची माहिती आहे. अमेरिकेने त्याच्यावर ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.

एल मेंचोने गांजा, अफू, हेरॉइन, कोकेन, मेथाम्फेटामाइन यांसह ड्रग्ज व्यापार, मुलींचा पुरवठा, हिंसाचार आणि लाचखोरी या सर्व मार्गांनी प्रचंड संपत्ती उभारली. त्याचे साम्राज्य एवढे वाढले की मेक्सिकोचे नाव जगभर कुप्रसिद्ध झाले. संपूर्ण देश ड्रग्जचा कारखाना बनला होता. त्याच्या कार्टेलमध्ये मेक्सिकोतील लाखो तरुण भरती झाले होते. आता त्याच तरुणांनी मेक्सिकोमध्ये जाळपोळ सुरू केली आहे. मेक्सिकोच्या ३२ पैकी किमान २१ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून सर्वसामान्य नागरिक घरात कैद झाले आहेत. त्यामुळे एल मेंचोचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या कार्टेलबाबत आता लष्कर काय निर्णय घेणार, यावर हा हिंसाचार वाढणार की कमी होणार हे अवलंबून आहे. ( El Mencho )
– सई बने
- arson attacks
- bounty reward
- cartel retaliation
- cartel succession
- cartel violence
- cocaine smuggling
- criminal empire
- Drug Trafficking
- El Mencho
- family involvement
- fentanyl trade
- heroin distribution
- Jalisco New Generation Cartel (CJNG)
- methamphetamine network
- Mexican drug lord
- Mexico unrest
- military operation
- money laundering
- narco-terrorism
- national security crisis
- Nemesio Oseguera
- organized crime
- US intelligence support