गोवा म्हटलं की तिथला निळ्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो. गोव्यात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. यात बागा बीच, कळंगुट बीच, अंजुना बीच, वागाटोर बीच, कांदोळीम बीच हे समुद्रकिनारे भारतीयांसह परदेशी पर्यटकांमध्येही प्रसिद्ध आहेत. मात्र गोव्यात फक्त समुद्रकिनारेच प्रसिद्ध नसून येथील मंदिरेही अत्यंत प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमध्ये हजारो वर्षांचा वारसा आजही जपला जात आहे. यातील अनेक मंदिरे मुघल तसेच इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या अत्याचारी राजवटीपासून वाचवण्यात आली आहेत. या प्रमुख मंदिरांमध्ये मंगेशी मंदिर, शांतादुर्गा मंदिर, महालसा नारायणी मंदिर आणि १३व्या शतकातील तांबडी सुरला महादेव मंदिराचा समावेश होतो. या मंदिरांमधील अद्वितीय वास्तुकला आजही भाविकांना आश्चर्यचकित करते. यामध्ये पोंडा तालुक्यातील शिरोडा येथे असलेले देवी कामाक्षीला समर्पित श्री कामाक्षी मंदिराचाही समावेश आहे. याच श्री कामाक्षी मंदिराची माहिती आपण जाणून घेणार आहोत. चैत्र नवरात्रीनिमित्त हे मंदिर सुंदर सजवण्यात आले असून हजारो भाविक देवी कामाक्षीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत आहेत. ( Kamakshi Devi Temple )

आसाममधील प्रसिद्ध कामाख्या मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. गोव्यातही या कामाख्या देवीला समर्पित एक मंदिर आहे. गोव्यातील या मंदिरात कामाख्या देवीला कामाक्षी देवी म्हणून ओळखले जाते. गोव्याच्या शिरोडा या निसर्गरम्य गावात हे कामाक्षी संस्थान मंदिर असून १६व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिराची उभारणी झाली. कामाक्षी मंदिर हे मोठे संकुल असून यात अन्यही मंदिरे आहेत. या संकुलाकडे जाण्यासाठीचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील नक्षी आकर्षक आहे.
सध्या कामाक्षी मंदिर ज्या ठिकाणी आहे, ती या मंदिराची मूळ जागा नाही. मूळ कामाक्षी मंदिर साळसेट तालुक्यातील राया गावात होते. तिथून कामाक्षी देवीची मूर्ती शिरोडा गावात आणण्यात आली. त्याला कारण ठरले ते पोर्तुगीज. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. अनेक हिंदूंना धर्मांतरास भाग पाडण्यात आले. ज्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही, त्यांच्या जमिनी आणि घरे बळकावण्यात आली. अशाच प्रकारे हिंदूंची मंदिरेही उद्ध्वस्त करण्यात आली. या अत्याचारांना ‘इन्क्विझिशन’ असे म्हटले जाते. यात अनेक पुरातन वारसा असलेली मंदिरे पाडण्यात आली. ( Kamakshi Devi Temple )
अशातच राया गावातील कामाक्षी मंदिरालाही पाडण्यात येणार असल्याची माहिती देवीच्या भक्तांना मिळाली. मंदिर पाडून पोर्तुगीज त्यातील संपत्ती बळकावत असत, तसेच त्या जागी चर्चची उभारणी करत असत. त्यामुळे पोर्तुगीजांच्या तावडीतून माता कामाक्षीची मूर्ती वाचवून ती १५६४ ते १५६८ या कालावधीत पोंडा तालुक्यातील शिरोडा गावात हलवण्यात आली आणि तेथे नव्याने मंदिर उभारण्यात आले. यासाठी राया गावातील एका कुंभाराने काही भक्तांच्या मदतीने देवी कामाक्षीची मूर्ती नदीपार नेली. देवीची मूर्ती नेताना मूळ स्थानातील काही ग्रामस्थही देवीसोबत आले. नंतर हे ग्रामस्थ शिरोडा गावात स्थायिक झाले आणि देवीच्या सेवेत रुजू झाले.
शिरोडा गावात उभारण्यात आलेले कामाक्षी संस्थान मंदिर सुरुवातीपासूनच भव्य स्वरूपात उभारले गेले. येथे भगवान शंकर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि देवी शांतादुर्गा यांची मंदिरेही आहेत. दर अमावस्येला श्री लक्ष्मीनारायणाची पालखी मंदिराच्या आवारात फिरवली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. याशिवाय येथे अमावस्येला यात्राही भरते. त्यावेळी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमधून हजारो भाविक येतात. ( Kamakshi Devi Temple )
श्री कामाक्षी माता मंदिराची वास्तुकला अत्यंत देखणी आहे. मंदिराच्या बाहेर भव्य तुळशी वृंदावन आहे. देवीच्या मंदिरासमोर उंच दीपस्तंभ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर लाकडी सभामंडप असून त्याचे दोन लाकडी खांब साधारण साडेआठ फूट उंच आहेत. त्यांच्या बाजूला भव्य समया असून त्यामध्ये एकाच वेळी पाच लिटरपेक्षा अधिक तेल मावते. मंदिराच्या आवारात श्री काळभैरवाचे मंदिरही असून कालभैरव जयंतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो.
=======
हे देखील वाचा : Maihar Mata Temple : या देवीच्या मंदिरात रात्री होतो रहस्यमयी घंटानाद
=======
माता कामाक्षीची मूर्ती असलेल्या गर्भगृहाचे दरवाजे चांदीचे आहेत. गर्भगृहात देवी कामाक्षी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. येथे देवीला विविध फुलांनी आणि अलंकारांनी सजवले जाते. श्री कामाक्षी देवीची मूळ मूर्ती चांदीच्या नागाच्या रूपात असून ती ‘महिषासुरमर्दिनी’च्या रूपात आहे. देवीला चार हात आहेत. तिने उजवा पाय महिषासुरावर ठेवला आहे. देवीच्या उजव्या पुढच्या हातात त्रिशूळ, उजव्या मागच्या हातात तलवार आणि डाव्या मागच्या हातात ढाल आहे. या मूर्तीची एक छोटी प्रतिकृती गर्भगृहात देवीजवळ ठेवली जाते.
चैत्र नवरात्रोत्सवात या मूर्तीला विशेष सजावट केली जाते. तसेच मंदिराचीही फुलांनी आकर्षक सजावट केली जाते. मंदिरात अहोरात्र देवीच्या नामकीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो. यासाठी फक्त मंदिरच नव्हे तर संपूर्ण शिरोडा गाव सजवले जाते. हे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे आवर्जून येतात. ( Kamakshi Devi Temple )
— सई बने
- Chaitra Navratri festival Goa
- cultural heritage Goa
- devotional practices India
- Goa religious festivals
- Goa temple heritage
- heritage temples India.
- Hindu pilgrimage Goa
- Hindu temples in Goa
- Indian goddess traditions
- Indian temple architecture
- Kamakhya and Kamakshi connection
- Kamakshi Devi history
- Kamakshi Devi significance
- Kamakshi Devi Temple Goa
- Kamakshi Devi worship
- Mahishasuramardini form
- Navratri celebrations India
- Portuguese rule Goa temples
- religious tourism Goa
- sacred temples Goa
- Shiroda Kamakshi Temple
- Shiroda temple complex
- spiritual destinations India
- temple relocation history Goa