चहा हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. जगभर दररोज २ ते ५ अब्ज नागरिक आपल्या दिवसाची सुरुवात याच चहापासून करतात. दिवसभरात अंदाजे ३ अब्ज कप चहा प्यायला जातो. चीन, भारत, तुर्की, अर्जेंटिना आणि श्रीलंका हे प्रमुख उत्पादक देश आहेत. शिवाय चीन आणि भारत हे दोन देश जगातील सर्वात मोठे ग्राहक आहेत. असे चहाप्रेमी जगभर असले, तर हे चहाप्रेमी नेमका कुठल्या प्रकारचा चहा पितात, याचीही उत्सुकता आहे. अशा उत्सुकांना आश्चर्याचा धक्का देणारी माहिती पुढे आली आहे. कारण जगभरात चहाचे अनेक प्रकार असले तरी चीनमध्ये होणारा एक चहा सर्वाधिक महागडा आहे. महागडा म्हणजे किती, तर या चहाची किंमत काही कोटींमध्ये आहे. दा होंग पाओ हा जगातील सर्वात महागडा आणि दुर्मिळ चहा म्हणून नोंद करण्यात आला आहे. हा दा होंग पाओ चहा चीनच्या फुजियान प्रांतातील वुयी पर्वतरांगांमध्ये तयार होतो. हा चहा सोन्याहून अधिक मौल्यवान आहे. प्रति किलोग्राम ९ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या दा होंग पाओ चहामध्ये अगणित औषधी गुणधर्म आहेत. चीनमधील मिंग राजवंशाने या चहाचा शोध लावल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दा होंग पाओ या चहाला चीनचा राष्ट्रीय खजिना म्हणूनही संबोधले जाते. ( Da Hong Pao )

जगातील सर्वात महाग असलेल्या चहाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या चहाची प्रत, त्यांच्यातील गुणधर्म आणि वैशिष्ट्यांची तपासणी करूनच ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. यामध्ये चीनमधील दा होंग पाओ या चहाने प्रथम क्रमांक पटकवला आहे. अर्थात, हा पहिल्या क्रमांकाचा चहा पिण्याची इच्छा लगेच झाली, तर जरा थांबा… कारण या चहाची किंमत वाचून आपला नेहमीचा चहाच नंबर वन आहे, असे तुमचे मत होईल. कारण दा होंग पाओ हा चहा ९ कोटी रुपये प्रति किलोपासून विकला जातो. त्याचे उत्पादन पाहून त्याची किंमत ठरवली जाते, ती बहुधा या ९ कोटींपेक्षा काहीवेळा अधिकच असते. दा होंग पाओ हा जगातील सर्वात महागडा चहा ठरला आहे, कारण त्याच्या तोडणीची प्रक्रिया पूर्णतः वेगळी आहे. या चहाची किंमत त्याच्या झुडपांमध्ये दडलेली आहे. कारण या चहाची झाडे आत्ताची नसून त्यांची लागवड तब्बल ३५० वर्षांपूर्वी झाल्याची माहिती आहे. चीनचा प्रसिद्ध राजवंश म्हणून मिंग राजवंशाची ओळख आहे. याच मिंग राजवंशाच्या काळात दा होंग पाओ चहा ज्या झाडांच्या पानांपासून तयार होतो, त्यांची लागवड करण्यात आली. या चहाची लागवड एका विशिष्ट भूप्रदेशात केली जाते. तिथे खडकाळ जमीन असून बहुतांश वेळा धुके पसरलेले असते. याच हवामानाचा परिणाम या दा होंग पाओ चहावर होतो आणि त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मांचा समावेश होतो. त्यामुळेच दा होंग पाओ केवळ सोन्याइतकाच मौल्यवान नाही, तर त्याहून अधिक किंमतीने विकला जातो.
या चहाची लागवड मिंग राजवंशासाठी पहिल्यांदा करण्यात आली होती. दक्षिण चीनच्या फुजियान प्रांतातील वुयिशान या धुक्याने वेढलेल्या नदीकाठच्या शहरात दा होंग पाओ चहाची छोटी झुडपे आहेत. त्यातील काही झाडे ३५० वर्षांपूर्वीची असल्याची माहिती येथील चहा उत्पादक देतात. या भागात पिढ्यानपिढ्या अनेक घराणी चहा उत्पादक म्हणून काम करत आहेत. आज चहा निर्मितीच्या व्यवसायात आधुनिकीकरण आले असले तरी दा होंग पाओ चहाचे उत्पादक आपल्या पारंपरिक पद्धतीनुसारच या चहाची तोडणी आणि नंतरची सर्व प्रक्रिया करतात. दा होंग पाओ चहाचे उत्पादक प्रत्येक वसंत ऋतूमध्ये या चहाच्या झुडपांची पूजा करतात. या मूळ झाडांना ‘मातृवृक्ष’ म्हणून मान देण्यात येतो. त्यापासून आता अनेक कलमे तयार करण्यात येत आहेत. त्यांच्या पानांपासून दा होंग पाओ चहा तयार होत असला, तरी मातृवृक्ष म्हणून मान मिळालेल्या मूळ झुडपांपासून तयार झालेला दा होंग पाओ चहा अधिक मौल्यवान असतो. ( Da Hong Pao )
=======
हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती
=======
मूळ दा होंग पाओची झुडपे मंदिराच्या जमिनीवर होती; पण नंतर या चहाची वाढलेली मागणी आणि किंमत पाहता त्यांचे व्यवस्थापन सरकारकडे सोपवण्यात आले. या झुडपांपासून दरवर्षी मिळणाऱ्या उत्पादनापैकी काही ठराविक उत्पादन सरकारसाठी राखून ठेवण्यात येते. या चहाची कोटींमध्ये असलेली किंमत पाहता त्यांच्या संरक्षणासाठी सुसज्ज जवान २४ तास तैनात असतात. अर्थात, दा होंग पाओ चहाचा स्वाद त्याच्या किंमतीमुळे ज्यांना घेता येत नाही, असे हजारो नागरिक रोज दा होंग पाओ चहाची झुडपे जिथे आहेत त्या भागाला भेट देतात आणि दूरूनच या झुडपांना पाहण्याचा आनंद घेतात. दा होंग पाओ हा सर्वाधिक औषधी गुणधर्मांचा चहा मानला जातो. त्याचे सेवन केल्यावर चिरतारुण्य लाभते, अशीही कथा सांगितली जाते. ( Da Hong Pao )
— सई बने
- ancient tea bushes
- ancient tea cultivation
- Chinese tea culture
- Da Hong Pao tea
- elite collectors’ tea
- government-protected tea plants
- heritage tea gardens
- high-altitude tea cultivation
- high-value tea trade
- historic tea plantations
- imperial tribute tea
- luxury beverage
- luxury tea industry.
- luxury tea market
- medicinal properties of tea
- Ming Dynasty heritage
- mother tea plants
- national treasure of China
- premium oolong tea
- rare agricultural product
- rare Chinese tea
- tea tourism China
- traditional tea processing
- world’s most expensive tea
- Wuyi Mountains Fujian