भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी त्यांच्या रहस्यांसाठी जगभरात ओळखली जातात. असेच एक मंदिर मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतावर आहे. येथील मैहर माता मंदिर हे देवी शारदेला समर्पित असून ५१ शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. मातेचे जागृतस्थळ असलेल्या या मंदिराबाबत अनेक गूढ कथा सांगितल्या जातात. या मंदिराचे दरवाजे रात्री कडी-कुलूप घालून बंद केले जातात. तरीही मंदिराच्या गर्भगृहातून मध्यरात्री घंटा वाजवण्याचा आवाज येतो. पहाटे जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात, तेव्हा येथे मातेची पूजा झाल्याचे आढळते. मैहर माता मंदिरात रोज होणारा हा चमत्कार उलगडण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. गुप्त कॅमेरेही लावण्यात आले, मात्र हे रहस्य कोणीही शोधू शकले नाही. माता मैहर देवीच्या मंदिरात रात्री वाजणाऱ्या या घंटानादासाठी येथे अल्हा-उदलची कथा सांगितली जाते. उंच डोंगरावर असलेल्या या शारदा देवीला समर्पित मंदिरात सध्या चैत्र नवरात्रीची धूम सुरू आहे. ( Maihar Mata Temple )

मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतरांगांवर वसलेले मैहर माता मंदिर हे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. या मंदिराला माता शारदा धाम म्हणूनही ओळखले जाते. आख्यायिकेनुसार, देवी सतीचा हार येथे पडला. त्यामुळे या स्थानाला ‘मैहर’—माई आणि हार, म्हणजेच मातेचा हार—असे नाव पडले. अल्हा आणि उदल या दोन शूरवीरांनी मंदिराचा शोध लावला आणि येथे देवीने अल्हाला अमरत्वाचे वरदान दिले. हे दोघेही देवीचे परमभक्त होते. आजही अल्हा आणि उदल यांचे अस्तित्व या मंदिरात जाणवते, अशी श्रद्धा आहे.
मैहर माता मंदिर हे श्रद्धा, चमत्कार आणि रहस्यांचा अनोखा संगम आहे. विंध्य पर्वतरांगेतील त्रिकुटा टेकडीवर वसलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी भाविकांना १,०६३ पायऱ्या चढाव्या लागतात. येथे शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मोठा मेळा भरतो. यावेळी देवी शारदेचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येतात. भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी देवीकडे प्रार्थना करतात आणि खऱ्या मनाने केलेली प्रार्थना प्रत्येक इच्छा पूर्ण करते, असा विश्वास आहे. मात्र इतर मंदिरांप्रमाणे येथे दिवसरात्र नामस्मरणाचा सोहळा होत नाही, कारण रात्री ठरावीक वेळेनंतर मंदिराचे दरवाजे कडी-कुलूप घालून बंद केले जातात. ( Maihar Mata Temple )
दरवाजे बंद केल्यानंतरही येथे घंटानाद ऐकू येतो. देवीचे भक्त याला दैवी संकेत मानतात. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शंकर देवी सतीचे पार्थिव घेऊन जात होते, तेव्हा भगवान विष्णूंनी तिच्या शरीराचे ५२ तुकडे केले. जिथे जिथे सतीच्या शरीराचे तुकडे पडले, तिथे शक्तीपीठे निर्माण झाली. मैहर येथे देवी सतीचा हार पडल्याचे मानले जाते.
मैहर देवी मंदिर हे शूरवीर अल्हा आणि उदल यांच्या भक्तीसाठीही प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की त्रिकुटा पर्वताच्या घनदाट जंगलात लपलेले हे मंदिर बुंदेलखंडचे शूर योद्धे अल्हा आणि उदल यांनी शोधून काढले. आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी अल्हाने १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली आणि आपले शीर अर्पण केले. प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्याला पुन्हा जिवंत केले आणि अमरत्व प्रदान केले. स्थानिक कथेनुसार, आजही अल्हा आणि उदल ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आदिशक्तीची पहिली आरती आणि पूजा करतात. गर्भगृहातून होणारा घंटानाद हेच अल्हा आणि उदल करतात, अशी श्रद्धा आहे. ते ब्रह्ममुहूर्तावर मातेची पूजा करून सुवासिक पुष्प अर्पण करतात. पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यावर या फुलांचा सुवास सर्वत्र पसरलेला असतो. ( Maihar Mata Temple )
=======
हे देखील वाचा : Goddess Dhumavati : माता धूमावतीचे रहस्य
=======
अल्हा आणि उदल हे महान योद्ध्यांमध्ये गणले जातात. त्यांनी पृथ्वीराज चौहानला युद्धात पराभूत केले होते, अशी आख्यायिका आहे. नंतर गुरू गोरखनाथांच्या आज्ञेनुसार अल्हाने संन्यास घेतला. आजही अल्हाची तलवार आणि पादुका मंदिरात पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत, आणि भक्त त्यांना मनोभावे नमस्कार करतात.
आदि शंकराचार्यांनी इ.स. ५५९ मध्ये येथे माता मैहरच्या मूर्तीची स्थापना केल्याचे मानले जाते. मंदिरात जाण्यासाठी असलेल्या १,०६३ पायऱ्या महाराजा दुर्जन सिंह जुदेव यांनी १८२० मध्ये बांधल्या. हे मंदिर त्रिकुटा पर्वतावर असून तेथून मैहर शहराचे विहंगम दृश्य दिसते. देवी शारदा ही विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीचा अवतार मानली जात असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. चैत्र नवरात्रीमध्येही येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात आणि मातेच्या चरणी लीन होतात. ( Maihar Mata Temple )
– सई बने
- 1063 temple steps
- Adi Shankaracharya स्थापना
- Alha Udal story
- Brahma Muhurta worship
- Bundelkhand warriors
- Chaitra Navratri festival
- divine miracle story
- Durjan Singh Judeo history
- Hindu temple mysteries
- Indian mythology temple
- locked temple phenomenon
- Madhya Pradesh pilgrimage
- Maihar Mata Temple
- midnight temple miracle
- mysterious bell sounds
- Navratri devotees gathering
- sacred Hindu shrines.
- Saraswati incarnation belief
- Sati necklace legend
- Satna district temple
- Shakti Peeth India
- sharda devi temple
- spiritual legends India
- Trikuta Hill shrine
- Vindhya mountain temple