‘एव्हरी डे इज नॉट संडे’ असा इंग्लिशमध्ये वाक्प्रचार आहे. पण भारतीय संघाने आपल्या पराक्रमाने गेल्या दोन आठवड्यांत प्रत्येक दिवस आपल्यासाठी ‘संडे’ असल्याचे दाखवून दिले. २०२६ च्या टी-२० स्पर्धेत दोन रविवार अत्यंत महत्त्वाचे होते. एका रविवारी भारताने पाकिस्तानला हरवून तमाम ‘अतिरेकी’ राष्ट्रवाद्यांची तोंडे बंद केली, तर ८ मार्चला ‘नरेंद्र मोदी’ नावाची ऍलर्जी असलेल्या ‘विघ्नसंतोषी’ ‘लिबरल मंडळींचे’ दात त्यांच्याच घशात घालताना न्यूझीलंडला ९६ धावांनी लोळवले आणि टी-२०चा विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा दिमाखात खिशात घातला. याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. ( T-20 World Cup Finals )
भारताने या विजयाने २०२३च्या एकदिवसीय ५० ओव्हर्सच्या विश्वकप स्पर्धेतील अहमदाबादच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या दुःखद स्मृती धुऊन काढल्या. त्यावेळी रोहित शर्माने गाळलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ असे म्हटले, तर वावगे ठरू नये.
या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या ‘गुजराती’ त्रिकुटाची ‘नरेंद्र मोदी’ स्टेडियमवरील कामगिरी.

न्यूझिलंडने ज्या पद्धतीने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे ‘पानिपत’ केले होते, ते बघता भारताला अंतिम सामन्यात न्यूझिलंडला हरवण्यासाठी घाम गाळावा लागेल, असा अंदाज होता. पण टॉस हरून फलंदाजीची ‘गिफ्ट’ मिळाल्यावर भारताने संधीचे सोने केले. अभिषेक शर्माला टीममधून काढून टाकणाऱ्या ‘मीडियाला’ अभिषेकने आपल्या प्रत्येक चौकार, षटकाराने सणसणीत चपराक लगावली. संजू सॅमसनने पुन्हा एकदा सिद्ध केले की विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघात एक तरी ‘मल्याळी’ खेळाडू असणे अत्यावश्यक आहे. यातला विनोदाचा भाग सोडला, तर सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये सुद्धा शास्त्रशुद्ध फलंदाजी करून २००% च्या वर स्ट्राईक रेट ठेवता येतो, हे दाखवून दिले. त्याने याही सामन्यात ८९ धावा काढताना त्याचा सेमीफायनलमधला डावच जणू पुढे चालू केला. ईशान किशनने अर्धशतक ठोकताना पाकिस्तानविरुद्ध काढलेल्या ७७ धावा या ‘फ्लूक’ नव्हत्या, हे सिद्ध केले. या ‘झारखंड’च्या वादळात प्रतिस्पर्धी संघाचा ‘पाचोळा’ झाला. महाराष्ट्रातील मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या ‘अमराठी’ खेळाडूंनी वेळोवेळी संघाला अनमोल मदत केली. सूर्यकुमारने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-२०चे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना आपले नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमचे कोरले. ( T-20 World Cup Finals )
या सामन्यात ईशान किशनने रचिन रवींद्रचा जो झेल घेतला, तो सेमीफायनलमधील अक्षर पटेलने घेतलेल्या झेलाचा ‘रिप्ले’ होता. हा झेल मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.
बुमराहच्या खतरनाक यॉर्करना अक्षर पटेलच्या डोकेबाज गोलंदाजीची जोड मिळाली. या दोघांपुढे न्यूझिलंडने नांगी टाकली.
न्यूझिलंडने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना भारतीय संघाला अंडरएस्टीमेट केले. त्यांनी गृहित धरले की आफ्रिकेला ज्याप्रमाणे त्यांनी झोडपून काढले, त्याचीच पुनरावृत्ती ते भारताविरुद्ध करतील. पण सध्याचा भारत हा एक ‘नया भारत’ आहे, हे ते ओळखू शकले नाहीत.
=======
हे देखील वाचा : Road to Finals: रोमांचकारी विजय पण… अहमदाबाद अभी भी दूर है .
=======
गेल्या २ वर्षांत भारताने जी विजेतेपदांची मालिका सुरू केली आहे, त्याच काळात ‘जय शाह’ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असणे हा योगायोग भले काहींना नाकं मुरडायला लावणारा असला, तरी सत्य आहे, हे कसे नाकारता येईल. गौतम गंभीरलाही या विजयाचे तेवढेच श्रेय आहे; कारण एखादा सामना हरला की त्याच्या नावाने शिमगा करणारे काही कमी नाहीत. ( T-20 World Cup Finals )
निवड समितीलाही या विजयाचे श्रेय आहे. ईशान किशनचा ऐनवेळी संघात समावेश करणे, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्तीवर विश्वास दाखवणे, याबद्दल निवड समिती अभिनंदनास पात्र आहे.
भारत तिसऱ्यांदा टी-२०चा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ ठरला, मायदेशात ही स्पर्धा जिंकणारा हा पहिला संघ ठरला, तर लागोपाठ दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणाराही पहिला संघ ठरला. विजयाचा हा ‘त्रिवेणी संगम’ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. यामुळेच चाहत्यांना, ‘मोदी स्टेडियमवर मोद मनी जाहला’!
रघुनंदन भागवत
८ मार्च २०२६
- 96-run victory
- Abhishek Sharma
- Axar Patel
- back to back title
- crushing win
- dominant bowling
- final victory
- gautam gambhir
- Hardik Pandya
- historic record
- home triumph
- India champions
- India vs New Zealand
- Ishan Kishan
- Jasprit Bumrah
- match turning moment
- Narendra Modi Stadium
- New Zealand collapse
- Sanju Samson
- selection committee
- Shivam Dube
- smart batting
- Suryakumar Yadav
- T20 World Cup
- turning point catch