भारताच्या प्रत्येक भागामध्ये भगवान शंकराची मंदिरे आहेत. यामध्ये अनेक पौराणिक वारसा असलेली मंदिरे आहेत. भगवान शंकराच्या या प्रत्येक मंदिराची वेगळी आख्यायिका आणि ओळख आहे. यातीलच एक मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील नल्लूर गावात स्थित, कल्याण सुंदरेश्वर मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. भाविकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरातील शिवलिंग दिवसातून पाच वेळा रंग बदलते. या अनोख्या आणि चमत्कारी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी केवळ तामिळनाडूमधूनच नव्हे तर शेजारच्या राज्यांमधूनही भाविक येथे येतात. हे मंदिर सुमारे एक हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. चोल राजवंशात सुंदरेश्वर मंदिर उभारण्यात आले. त्याची भव्यता ही आजही आश्चर्याचा विषय मानली जाते. आता येत असलेल्या शिवरात्रीनिमित्त या सुंदरेश्वर मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा होणार आहे, त्यासाठी मंदिराची सजावट सुरु झाली आहे. ( Kalyana Sundareswarar Temple )

तामिळनाडूतील कल्याण सुंदरेश्वर मंदिर हे त्याच्या वास्तूशास्त्रासाठी आणि भव्यतेसाठी ओळखले जाते. शिवाय या मंदिरातील शिवलिंग दिवसातून पाच वेळा रंग बदलत असल्यामुळे मंदिराबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मंदिरातील शिवलिंगाचा सकाळी काळा, दुपारी पांढरा, संध्याकाळी लाल, रात्री हलका निळा आणि मध्यरात्री हिरवा रंग असतो. चोल काळात बांधलेल्या या मंदिरातील शिवलिंग हे नैसर्गिकरित्या रंग बदलते, त्यामुळे या शिवलिंगाचे हे पाचही रंग बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं मंदिरात उपस्थित असतात. या मंदिरात भागवान शंकराची पूजा कल्याणसुंदरासन म्हणून केली जाते. मंदिरामध्ये भगवान शंकरांची पत्नी, देवी पार्वतीला गिरीसुंदरी म्हणून चित्रित केले आहे. सातव्या शतकात नयनार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पादल पेत्र स्थलम म्हणून वर्गीकृत केलेल्या तमिळ शैव धर्मग्रंथ तेवरममध्ये मुख्य देवतेचे पूज्य स्थान आहे.
या सुंदरेश्वर मंदिराची आख्यायिका अगस्त्य ऋषी आणि ६३ नयनारांपैकी एक असलेल्या अमरनेती नयनार यांच्याशी संबंधित आहे. हे मंदिर चोल सम्राट राजराज चोलच्या कारकिर्दीत बांधण्यात आले. नंतरच्या चोल सम्राटांनीही या मंदिराची उभारणी केली. त्यामुळे या मंदिराला भव्य स्वरुप प्राप्त झाले. चोल सम्राटांपासून मंदिरामध्ये अनेक परंपरा सुरु झाल्या. भगवान शंकराची पूजाही अत्यंत पुरातन पद्धतीप्रमाणे इथे आजही होत आहे. या मंदिरात भगवान मुरुगाला विशेष महत्त्व आहे. भगवान शिव आणि मुरुगा दोघांचेही भक्त दर्शनासाठी या मंदिरात येतात. सुंदरेश्वर मंदिरात दोन काळ्या दगडाची शिवलिंगे आहेत. गर्भगृहात पहिले शिवलिंग सोन्याने सजवलेले आहे आणि दुसरे शिवलिंग मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. ( Kalyana Sundareswarar Temple )
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिवलिंगाला दररोज सकाळी चंदनाच्या लेपनाने अभिषेक केला जाते. या मंदिरातील शिवलिंग जसे पाच वेळा रंग बदलते, तशीच दिवसातून पाच वेळा या शिवलिंगाची पूजा केली जाते. पूजारी आणि भाविकांचा असा विश्वास आहे की, प्रत्येक पूजेच्यावेळी साक्षात भगवान शंकर मंदिर परिसरात वेगवेगळ्या रूपात प्रकट होतात. भक्तांच्या सांगण्यानुसार येथे भगवान शंकर सकाळी नंदीसह वैद्यनाथाच्या रूपात प्रकट होतात. त्यामुळे सुंदरेश्वर मंदिरामध्ये सकाळच्या आरतीच्यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात. येथील शिवलिंगाच्या रंगात का आणि कसा बदल होतो, हे पाहण्यासाठी अनेक संशोधकांनी पाहणी केली आहे. मात्र त्यांना या रहस्याचा भेद कऱण्यात अपयश आले आहे. शिवलिंगाच्या रंगामध्ये होणारा बदल कोणत्याही मानवी प्रयत्नाशिवाय, नैसर्गिकरित्या होत असल्याचे प्रत्येक संशोधनाच्यावेळी स्पष्ट झाल्यामुळे या मंदिराची आध्यात्मिक भव्यता आणखी वाढली आहे.
=======
हे देखील वाचा : Religious : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये चक्क पुरुषांना जाण्यास आहे मनाई
=======
या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत, त्यानुसार सुंदरेश्वर मंदिर आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून अगस्त्य ऋषींनी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह पाहिला होता. त्यानंतर भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अगस्त्य ऋषींनी मुख्य लिंगामागे एक लिंग स्थापित केले. या आख्यायिकेमुळेही या मंदिरात महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चोल सम्राट हे भगवान शंकराचे मोठे भक्त होते. त्यांनी या शिवलिंगावर भव्य असे मंदिर उभारण्यास सुरुवात केली. सातव्या शतकातील नयनार संत संबंदर आणि अप्पर यांनी त्यांच्या काव्यात्मक रचना, तेवरममध्ये या मंदिराचे वर्णन केले आहे. ( Kalyana Sundareswarar Temple )
मंदिर परिसरात सापडलेल्या एका शिलालेखावरून माहिती मिळते की, मंदिराचे मूळ दगडी बांधकाम आणि बुरुज नवव्या शतकातील आहेत. चोल राजांनी इसवी सन ८५० ते १२८० पर्यंत चार शतकांहून अधिक काळ या प्रदेशावर राज्य केले आणि सुंरदेश्वर मंदिराचे संरक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हे मंदिर द्रविड शैलीच्या वास्तुकलेमध्ये बांधले गेले आहे. मंदिराला पाच मजली राजगोपुरम असून त्यांची भव्यताही भाविकांना मोहीत करते. शिवाय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सप्तसागरम नावाचा एक मोठा तलाव आहे. त्याचीही पूजा केली जाते. सुंदरेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, गर्भवती महिलांनी मंदिरामध्ये प्रार्थना केल्यास त्यांची प्रसूती सुलभ होते, असे स्थानिक मानतात. या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव होतात, या सर्वात महाशिवरात्रीचा उत्सव सगळ्यात मोठा असतो. सध्या याच महाशिवरात्रीची तयारी मंदिरात सुरु आहे. ( Kalyana Sundareswarar Temple )
सई बने
- Amarnethi Nayanar
- ancient inscriptions 9th century.
- Appar
- black white red blue green
- Chola dynasty temple
- color-changing lingam
- devotees pilgrimage
- Dravidian architecture
- five colors daily
- five-tier Rajagopuram
- gold-decorated lingam
- Kalyana Sundareswarar Temple
- Maha Shivratri festival
- miraculous Shiva lingam
- Murugan worship
- Nallur village
- Nayanar saints
- Panchakalas puja
- Raja Raja Chola
- Sage Agastya legend
- Sambandar
- sandalwood abhishekam
- spiritual mystery
- Tamil Nadu
- temple tank Saptasagaram
- Tevaram references
- Thanjavur district