Parenting Tips : साधारणपणे मुलं ही खेळकर, बोलकी आणि चंचल असतात. मात्र, एखादं मूल अचानक किंवा दीर्घकाळ अतिशय शांत, अबोल आणि एकटं राहू लागल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळा ही शांतता स्वभावाची असू शकते, पण अनेकदा ती मुलांच्या मनातील ताण, भीती किंवा भावनिक समस्यांचे संकेत देते. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष दिल्यास भविष्यातील गंभीर मानसिक अडचणी टाळता येऊ शकतात.
भावनिक ताण किंवा भीती
मुलं मनातल्या भावना सहज व्यक्त करू शकत नाहीत. शाळेतील दडपण, अभ्यासाचा ताण, शिक्षकांची भीती किंवा घरातील तणाव यामुळे मूल आतून घाबरलेलं असू शकतं. अशावेळी ते शांत राहणं पसंत करतं. ही शांतता म्हणजे मुलं सुरक्षित वाटत नसल्याचं लक्षण असू शकतं.
आत्मविश्वासाचा अभाव
काही मुलांमध्ये स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण झालेला असतो. वारंवार तुलना, टोमणे किंवा अपयशाचा अनुभव यामुळे मुलं बोलणं टाळू लागतात. आत्मविश्वास कमी झाल्याने ती स्वतःला इतरांपासून दूर ठेवतात आणि शांत राहतात. पालकांनी अशा वेळी मुलांचं कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

मानसिक आरोग्याशी संबंधित संकेत
सतत शांत राहणं हे चिंता (Anxiety), नैराश्य (Depression) किंवा भावनिक असंतुलनाचं लक्षण असू शकतं. मुलं खेळण्यात रस न घेणं, एकटेपणा पसंत करणं किंवा संवाद टाळणं ही मानसिक आरोग्य बिघडत असल्याची चिन्हं असू शकतात. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
शारीरिक त्रास किंवा आरोग्य समस्या
कधी कधी मुलं आजारी असतात, पण ते स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. डोकेदुखी, पोटदुखी, झोपेचा अभाव किंवा थकवा यामुळेही मूल शांत राहू शकतं. त्यामुळे मुलांच्या खाण्या-पिण्याकडे, झोपेच्या सवयींकडे आणि शारीरिक हालचालींकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे.
डिजिटल स्क्रीनचा अति वापर
मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेटचा अतिवापर मुलांना आभासी जगात रमवतो. त्यामुळे ते प्रत्यक्ष संवाद टाळू लागतात आणि शांत, एकाकी राहतात. तज्ज्ञांच्या मते, स्क्रीन टाइम मर्यादित न ठेवल्यास मुलांच्या सामाजिक कौशल्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.(Parenting Tips)
पालकांनी काय करावं?
मुलांशी दररोज संवाद साधणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि सुरक्षित वातावरण देणं गरजेचं आहे. मुलं सतत शांत राहत असतील तर त्यांना ओरडण्याऐवजी प्रेमाने बोलतं करा. गरज भासल्यास बाल मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics