आज सर्वत्र हनुमान जयंती साजरी होत आहे. चैत्र पूर्णिमेच्या दिवशी सकाळी 6 च्या सुमारास माता अंजनी आणि पिता केसरी यांच्या पोटी हनुमानाने जन्म घेतला. हनुमान म्हणजे शिवांश. भगवान शिवाचे अवतार म्हणून देखील हनुमानाची ओळख आहे. हनुमान ही शक्तीसोबतच बुद्धीची देवता म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यांच्या पराक्रमाने सर्वांनाच अचंभित केले होते. हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे, भीती आणि नकारात्मकता दूर होऊन मानसिक शक्ती, धैर्य, आरोग्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. हनुमान हे संकटमोचन असल्याने त्यांच्या उपासनेने शनिदोष जाऊन शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात. शिवाय हनुमानजींची उपासना केल्याने मानसिक शक्ती मिळते, भीती दूर होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. हनुमानाची पूजा करताना कायम त्यांना रुईच्या पानांचा हार आणि चमेलीचे तेल वाहिले जाते. हनुमानाला या दोन गोष्टी खूपच प्रिय आहे. (Hanuman)
हनुमानाला रुईच्या पानांची माळ घातली जाते. खास करुन शनिवारी रूईची पाने आणि फुले एकत्र करून तयार केलेली माळ त्यांना घातली जाते. यामागे एक कथा सांगण्यात येते. त्यानुसार, हनुमानाची आई माता अंजनी या मोठ्या गणेशभक्त होत्या. आपल्या मुलावर कायम गणपती बाप्पाची कृपादृष्टी रहावी अशा त्यांची सतत इच्छा असायची. गणपती म्हणजे साक्षात बुद्धीची देवता, म्हणूनच त्यांचा आशीर्वाद बाळाला मिळावा म्हणून माता अंजनी हनुमानजींच्या गळ्यात मंदार किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. पुढे आपल्या आईची आठवण म्हणून हनुमान त्यांच्या गळ्यात रुईची माळ घालू लागले. म्हणूनच आजही भक्तगण त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात. (Marathi)

रूईची अकरा पाने वापरतात कारण शिव पुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांनुसार हनुमानजी हे भगवान शिवाचे रुद्रावतार आहेत, जे अकरा रुद्रपैकी सर्वात शक्तीशाली मानले जातात. म्हणून तर मारूतीरायांना अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. तर रुईची पाने शीतलता व गणेशकृपेसाठी वाहिली जातात. या गोष्टी हनुमानाच्या मूर्तीमध्ये ऊर्जा जागृत करतात. शिवाय रुईच्या पानांमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते. (Top Trending Headline)
रुईच्या पानांसोबतच हनुमानाला तेल देखील वाहिले जाते. खासकरून चमेलीचे तेल त्यांचे आवडते तेल आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी शनिवारी हनुमानाला चमेलीचे तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. हनुमानाला तेल वाहण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रामायणात इंद्रजितने सोडलेल्या संहारक शस्त्रामुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला. तेव्हा त्यावर उपचार करण्यासाठी सुषेण वैद्यांच्या सांगण्यावरून मारुतीरायांनी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत मुळासकट उपटून तो घेऊन ते लंकेकडे रवाना झाले होते. हनुमान आकाशमार्गे लंकेकडे जात असता गैरसमजुतीने भरताने त्यांच्यावर बाण सोडला आणि ते खाली पडले. (Top Stories)
=========
Hanuman : हनुमानाने उचलून आणलेला द्रोणागिरी पर्वत आज कुठे आहे?
=========
मात्र तेव्हा हनुमानाने तो कोण आहे आणि का एवढा भव्य पर्वत घेऊन जात आहे, हे भरतला सांगितले. त्यानंतर तात्काळ भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम लवकर बरी होऊन हनुमान वेळेवर लंकेत पोहोचले. त्यामुळे तेव्हापासूनच हनुमानाला तेल वाहण्याची प्रथा रूढ झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र हनुमानाला चमेलीचे तेल अतिशय प्रिय आहे. चमेलीला पारशी भाषेत ‘यासमीन’ म्हणतात आणि त्याचा अर्थ ‘ईश्वराची देणगी’ असा होतो. जेव्हा हे फूलच ईश्वराची देणगी मानले जाते, तेव्हा त्यापासून तयार होणारे प्रत्येक पदार्थही देवाला प्रिय असतात अशी श्रद्धा आहे. याच मान्यतेनुसार, बजरंगबलींना चमेलीचे तेल आणि सिंदूर एकत्र अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे म्हणतात. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)