निसर्गाने अनेक गोष्टींना खास चव दिली आहे. गोड, आंबट, कडू, खारट या सर्व चवींनी आपले जीवन आणि जेवण समृद्ध केले आहे. यातली खारट चव ही मिठाचे प्रतिनिधित्व करते. खारट चव ही फक्त मिठालाच असते. पण असे नाहीये. अजून दोन गोष्टींना देखील ही खारट चव आहे. डोळ्यातील अश्रू आणि आपल्या अंगाला येणारा घाम या दोन्ही नैसर्गिक क्रिया आहेत. उन्हाळ्यात अंगाला येणारा घाम आणि डोळ्यातून येणारे अश्रू हे चुकून तोंडात गेले तर आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही चवीला खारट असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की घाम आणि अश्रू हे खारट का असतात? जाणून घेऊया याचीच माहिती. (Tears and Sweat)
यामागे मानवी शरीरातील रासायनिक प्रक्रिया आणि संतुलनाशी संबंधित महत्त्वाचं विज्ञान दडलं आहे. शरीरातून बाहेर पडणाऱ्या या द्रवांमध्ये काही विशिष्ट क्षार आणि खनिजे असतात. त्यामुळेच त्यांची चव खारट लागते. मानवी शरीरातील रक्तामध्ये विविध प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स विरघळलेले असतात. त्यामध्ये सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. शरीरातून जेव्हा घाम किंवा अश्रू बाहेर पडतात, तेव्हा या क्षारांचे अंश त्यात मिसळतात. त्यामुळे या द्रवांना खारट चव येते. हे घटक शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये भूमिका बजावतात. (Marathi)
डोळ्यांमधून येणारे अश्रू हे केवळ भावना व्यक्त करण्यासाठी नसतात, तर ते डोळ्यांच्या संरक्षणासाठीही अत्यंत आवश्यक असतात. अश्रूंमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी त्यात थोड्या प्रमाणात मीठ, प्रथिने आणि इतर घटकही असतात. या घटकांमुळे डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो आणि बाहेरून येणाऱ्या सूक्ष्मजंतूंविरुद्ध संरक्षण मिळतं. त्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. (Top Stories)

घामाबाबत बोलायचं झालं तर तो आपल्या शरीराची नैसर्गिक ‘कूलिंग सिस्टीम’ मानली जाते. जेव्हा तापमान वाढतं किंवा आपण मेहनतीची कामं करतो, तेव्हा शरीर गरम होऊ लागते. अशा वेळी त्वचेखालील घामग्रंथी सक्रिय होतात आणि शरीरातील पाणी व काही क्षार बाहेर सोडतात. हा घाम त्वचेवर येऊन बाष्पीभवन होतो आणि त्यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होते. (Latest Marathi News)
घामातील पाणी हवेत उडून गेल्यानंतर त्यातील मीठ त्वचेवर राहू शकते. म्हणूनच जास्त घाम आल्यावर कपड्यांवर किंवा त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात. शरीरातील मीठ आपोआप तयार होत नाही. आपण जे अन्न खातो आणि जे पाणी पितो त्यातूनच हे क्षार शरीरात जातात. शरीरातील पेशी, स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणे गरजेचे असते. (Top Marathi Headline)
जर शरीरात मीठाचे प्रमाण जास्त झाले, तर किडनी म्हणजेच मूत्रपिंड त्याला फिल्टर करून लघवीद्वारे बाहेर टाकते. या प्रक्रियेत घाम आणि अश्रू देखील काही प्रमाणात मदत करतात. त्यामुळे शरीरातील द्रव आणि क्षारांचे संतुलन टिकून राहते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी स्थिर राहते आणि आपलं शरीर निरोगी राहते. थोडक्यात काय तर, घाम आणि अश्रूंची खारट चव ही आपल्या शरीराची ‘बॅलन्स शीट’ आहे. ही चव आपल्याला आठवण करून देते की आपलं शरीर आतून किती जटिल आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics