काशी ही भगवान विश्वनाथाची नगरी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. बाबा विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी येथे रोज हजारो भक्त येतात आणि “बम बम भोले” असा जयजयकार करतात. मात्र याच काशीनगरीमध्ये विशालाक्षी शक्तीपीठही आहे. येथे माता विशालाक्षीच्या दर्शनासाठीही तशीच भाविकांची गर्दी होते. माता विशालाक्षीला येथे “विशालाक्षी अम्मा” म्हणून पूजले जाते. काशीतील प्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर असलेल्या विशालाक्षी मंदिरात सध्या चैत्र नवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे. चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस दररोज काशी विश्वनाथ धामातून माता विशालाक्षीला विशेष अलंकार आणि वस्त्रे अर्पण केली जातात. या संपूर्ण नवरात्री काळात विशालाक्षी मंदिरातील शिवार्चनम मंचावर दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिवाय येथे सप्तशती पाठही सुरू आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि माता विशालाक्षीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक काशीमध्ये येत असून त्यांच्या नियोजनासाठी मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. ( Vishalakshi Shakti Peeth )

देवी सतीचे कुंडल ज्या ठिकाणी पडले होते, त्या स्थानावर विशालाक्षी शक्तीपीठाची निर्मिती झाली आहे. या शक्तीपीठावर पूजा केल्याने मोक्ष, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, असा विश्वास भक्तांमध्ये आहे. चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने काशीची अम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशालाक्षी मंदिरात मोठी गर्दी झाली आहे. प्रसिद्ध मणिकर्णिका घाटाजवळ असलेल्या या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मातेच्या ५१ शक्तीपीठांपैकी हे एक महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. काशीतील या विशालाक्षी मंदिराचा उल्लेख देवी पुराणातही आढळतो. ( Vishalakshi Shakti Peeth )
दक्षिणात्य शैलीत बांधलेल्या या अनोख्या मंदिरात आदि शंकराचार्यांनी ८व्या शतकात श्रीयंत्राची स्थापना केली. त्यांनी रचलेल्या अठरा महाशक्तीपीठ स्तोत्रांमध्ये या शक्तीपीठाचा उल्लेख आहे. या मंदिरात आदिशक्तीचा कायम वास आहे, अशी श्रद्धा आहे. संपूर्ण काळ्या दगडातील माता विशालाक्षीची मूर्ती अत्यंत रेखीव असून सजीव भासते. दक्षिणात्य शैलीमुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोपुरम आहे. विजयनगर साम्राज्याच्या शासकांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. विशालाक्षी मंदिराची सध्याची रचना १८९३ मध्ये नट्टुकोट्टई नागरथर, म्हणजे तमिळनाडूतील व्यापारी समुदायाने केली. १९०८ मध्ये दक्षिण भारतीय भक्तांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला.
या मंदिरात दक्षिण भारतीय पूजा पद्धतीचे पालन केले जाते आणि दक्षिण भारतातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मंदिराला भाविक प्रेमाने “अम्मा विशालाक्षी धाम” असेही संबोधतात. दशाश्वमेध घाटाजवळील मीरघाट येथे हे पुरातन मंदिर आहे. काही स्थानिक या परिसराला मणिकर्णिका घाट असेही संबोधतात. मंदिराजवळच काशी विश्वनाथ मंदिर आणि अन्नपूर्णा मंदिर असल्याने भाविक बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर लगेच विशालाक्षी मातेचे दर्शन घेतात. या शक्तीपीठाजवळ प्रसिद्ध काळभैरव मंदिरही आहे आणि मातेच्या दर्शनापूर्वी अनेक भक्त काळभैरवाचे दर्शन घेतात. ( Vishalakshi Shakti Peeth )
=======
हे देखील वाचा : Shakumbhari Shakti Peeth : शाकुंभरी शक्तीपीठाची महती
=======
विशालाक्षी मंदिरात देवीच्या दोन मूर्ती आहेत. दोन्ही मूर्तींची पूजा आणि अभिषेक समान पद्धतीने केला जातो. माता विशालाक्षीची काळ्या रंगाची मूर्ती अत्यंत मनमोहक आहे. नवरात्रीत विजयादशमीच्या दिवशी घोड्यावर आरूढ असलेल्या चल मूर्तीची पूजा केली जाते, तर अचल मूर्तीची पूजा वर्षातून फक्त दोन वेळा केली जाते. पहिली पूजा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तृतीया दिवशी होते आणि दुसरी पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकूट उत्सवाच्या वेळी केली जाते.
सध्या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने येथे भाविकांना भोजन दिले जात आहे. नवरात्रीदरम्यान बाबा विश्वनाथ मंदिरातून शक्तीपीठ माता विशालाक्षी देवीला विधीपूर्वक वस्त्रे आणि अलंकार अर्पण केले जातात. या सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि शाश्वत श्रद्धेला विशेष महत्त्व आहे. आगामी दिवसांत आदिशक्तीच्या विविध रूपांसाठी श्री विश्वेश्वरांकडून वस्त्रे आणि अलंकार अर्पण केले जाणार आहेत. या निमित्ताने विशालाक्षी मंदिराचा परिसर विशेषरित्या सजवण्यात आला असून अहोरात्र भाविक मातेचा जयजयकार करत आहेत. ( Vishalakshi Shakti Peeth )
— सई बने
- 51 Shakti Peethas
- Adi Shankaracharya legacy
- Annapurna and Kashi Vishwanath connection
- Chaitra Navratri celebrations
- cultural programs Navratri
- Devi Purana reference
- Goddess Sati mythology
- Hindu goddess worship
- Kalbhairav temple significance
- Kashi spiritual heritage
- Kashi Vishalakshi Temple
- Manikarnika Ghat temple
- Moksha and prosperity belief
- Navratri rituals India
- religious tourism Uttar Pradesh
- sacred sites Varanasi
- Shakti worship traditions
- South Indian temple architecture.
- spiritual festivals India.
- Sri Yantra स्थापना
- Tamil devotee community
- Varanasi pilgrimage
- Vishalakshi Amma temple
- Vishalakshi Shakti Peeth