चैत्र नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवी म्हणजे माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री आहेत. मात्र या देवींसोबत चैत्र नवरात्रीमध्ये धूमावती मातेचीही पूजा केली जाते. नवरात्रीत धूमावती मातेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मुळात ही माता धूमावती नेमकी कोण, हा प्रश्न पडतो. धूमावती माता ही दहा महाविद्यांपैकी सातवी देवी असून तिला कमतरता, दुःख, वैधव्य आणि कुरूपतेची देवी मानले जाते. या धूमावती मातेचे रहस्य जाणण्यासारखे आहे. धूमावती मातेची मध्यप्रदेशातील दतिया आणि उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये चैत्र नवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होते. ( Goddess Dhumavati )

यावर्षी चैत्र महिन्याची नवरात्री १९ मार्च रोजी सुरू होत असून २७ मार्चपर्यंत नवरात्र उत्सव होईल. चैत्र नवरात्रीदरम्यान देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की नवरात्रीदरम्यान देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. यासोबत या नवरात्रात देवी धूमावतीचीही पूजा केली जाते. धूमावती माता ही दहा महाविद्यांपैकी सातवी देवी असून तिला कमतरता, दुःख, वैधव्य आणि कुरूपतेची देवी मानले जाते. ती सतीचे धुराच्या स्वरूपातील भौतिक रूप मानली जाते. धूमावती माता पूर्णपणे एकटी आणि स्वामीविहीन आहे. धूमावती मातेचे रहस्य असे आहे की ती आपल्याला जीवनातील दुःख, नको असलेले अनुभव आणि आध्यात्मिक पोकळी स्वीकारायला, त्यांच्यावर मात करायला आणि निर्भय बनायला शिकवते. माता धूमावती ही दारिद्र्य, दुःख आणि मृत्यूची देवी असून ती जीवनातील सत्याचे प्रतिनिधित्व करते. धूमावती मातेची साधना करण्यासाठी अनेक भाविक मातेच्या मोजक्या असलेल्या मंदिरात जातात. येथे साधनेद्वारे साधकाला स्वतःमधील शून्यता समजते आणि त्याला शांती व स्थिरता प्राप्त होते, असे मानले जाते.
धूमावती मातेच्या नावाप्रमाणे तिचे वाहनही आहे. कावळा हा माता धूमावतीचे वाहन असून अशुभ मानला जातो; परंतु कावळा ज्ञान आणि दीर्घायुष्याचे प्रतीक देखील आहे. मुख्यतः माता धूमावतीला एक तांत्रिक देवी मानले जाते. तंत्रशास्त्रानुसार देवी धूमावतीचे रूप विधवेचे आहे. तिचा रंग फिकट आहे आणि ती मळकट कपडे घालते. तिचे केस मोकळे आणि कोरडे आहेत. तिला पाहून शत्रूंच्या मनात भीती निर्माण होते. देवीच्या रथाच्या ध्वजावरही तिचे वाहन असलेल्या कावळ्याचे चिन्ह आहे. तिच्या हातात एक चाळणी आहे. तिचे नाक मोठे, डोळे वाकडे आणि स्तन लोंबकळलेले आहेत. ती सतत भूक आणि तहानेने व्याकूळ दिसते. देवी पार्वतीचे हे रूप शत्रूंचा आणि अधर्माचा नाश यांचे प्रतीक मानले जाते. तिला कालाहप्रिया, विरालदंत आणि चंचला या नावांनीही ओळखले जाते. ( Goddess Dhumavati )
धूमावती मातेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, जेव्हा सतीने दक्षाच्या यज्ञात स्वतःला जाळून घेतले, तेव्हा तिच्या जळत्या शरीरातून बाहेर पडलेल्या धुरातून धूमावतीचा जन्म झाला. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, एकदा माता पार्वतीने भुकेपोटी भगवान शंकराला गिळले. तेव्हा भगवान शंकराच्या कंठातील विषामुळे पार्वतीचे शरीर धुरात रूपांतरित झाले आणि ती एका विधवेसारखी दिसू लागली.
=======
हे देखील वाचा : Kaila Devi Temple in Rajasthan : आदिशक्ती कैला देवी
=======
याच धूमावती मातेची चैत्र नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते. धूमावती मातेचे सर्वात प्रसिद्ध आणि मुख्य मंदिर मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यातील पीतांबरा पीठाच्या आवारात आहे. मान्यतेनुसार, हे भारतातील देवी धूमावतीचे एकमेव सिद्ध मंदिर आहे. येथे शनिवारी भाविकांना मातेचे दर्शन घेता येते. आता चैत्र नवरात्रोत्सवातील शनिवारी या मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. याव्यतिरिक्त, वाराणसीमध्येही धूमावती मातेचे मंदिर आहे. वाराणसीमधील माँ धूमावती मंदिर हे धूपचंडी परिसरात आहे. हे मंदिर तांत्रिक साधकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. हे प्राचीन मंदिर महर्षी दुर्वासा यांनी स्थापन केल्याची मान्यता आहे. या मंदिरात अमावस्येला आणि महिन्याच्या आठव्या दिवशी विशेष पूजा केली जाते. ( Goddess Dhumavati )
– सई बने
- ancient Hindu mythology.
- Chaitra Navratri worship
- crow symbolism in Hinduism
- Dhumavati Mahavidya
- Dhumavati temple Datia
- Dhumavati temple Varanasi
- Dhupchandi area Varanasi
- Durga forms worship
- esoteric Hindu practices
- Goddess Dhumavati
- goddess of destruction and truth
- goddess of poverty and void
- Hindu goddess of sorrow
- Mahavidya traditions
- Navratri special पूजा
- Parvati transformation myth
- Pitambara Peeth Madhya Pradesh
- Sati smoke legend
- Shakta tradition India
- spiritual detachment symbolism
- spiritual emptiness concept
- tantric goddess
- Tantric Rituals India
- Ten Mahavidyas
- widow form of Devi