उत्तर कोरिया हा देश किम जोंग उन या हुकूमशहासाठी ओळखला जातो. या देशातील घड्याळही किमच्या आदेशानं चालतं, एवढे तिथे कडक नियम आहेत. याच देशात आता सत्तेसाठी पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यावेळी किमविरुद्ध त्याची सख्खी लहान बहिणच उभी राहिली आहे. उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता असलेल्या किम जोंग उन यांनी काही दिवसांपूर्वी आपला भावी उत्तराधिकारी म्हणून त्यांची १३ वर्षांची मुलगी किम जू ए हिला पुढे केले आहे. लवकरच किम यासंदर्भात संसदेतही घोषणा करणार असल्याची माहिती आहे. मात्र किमचा हा निर्णय त्यांच्या सख्या बहिणीसाठी धक्कादायक आहे. कारण उत्तर कोरियामध्ये किम जोंग उननंतर सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून त्यांच्या धाकट्या बहिणी किम यो जोंग हिचे नाव घेतले जाते. ती किमपेक्षा अधिक निर्दयी मानली जाते. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी किम यो जोंगवर आहे. उत्तर कोरियाच्या शेजारी देशांनाही तिचा बराच धाक आहे. किम जोंग उननंतर तिलाच देशाची उत्तराधिकारी समजले जात होते. अशात किम यांनी आपल्या १३ वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून पुढे केल्यामुळे उत्तर कोरियामध्ये आत्या विरुद्ध पुतणी असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. ( Kim Yo Jong )

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची निवड केल्यामुळे या देशात पुन्हा सत्तेसाठी रक्तरंजित कौटुंबिक संघर्ष होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. किम जोंग उन यांची मुलगी किम जू ए हिचे नाव लवकरच उत्तर कोरियाची प्रमुख म्हणून घोषित होणार आहे. सध्या जू ए १३ वर्षांची आहे. तिच्या १४व्या वाढदिवशी तिला भेट म्हणून उत्तर कोरियाची सत्ता तिचे वडील किम जोंग उन देणार असल्याची चर्चा आहे. मात्र असे झाले तर किमच्या कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे, कारण या सत्तेच्या स्पर्धेत किमची धाकटी बहिण किम यो जोंग हिचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. मात्र आपल्या बहिणीला बाजूला करून किम आपल्या मुलीला सत्तेची वारस घोषित करणार असल्यामुळे किम यो जोंग काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. यासाठी प्रथम उत्तर कोरियाची सत्ता कशी आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. उत्तर कोरियातील सत्तेचा इतिहास पूर्णपणे किम कुटुंबाभोवती केंद्रित आहे. १९४८ मध्ये देशाची स्थापना किम इल सुंग यांनी केली. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा किम जोंग इल आणि नंतर सध्याचे नेते किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सत्ता सांभाळली. तेव्हा किम जोंग उन फक्त २६ वर्षांचे होते. २०१० मध्ये त्यांना औपचारिकपणे उत्तराधिकारी घोषित करण्यात आले. डिसेंबर २०११ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा झाले.
आता त्याच किम जोंग उन यांनी आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी किम यांची तब्येतही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. किम यांना मधुमेह आणि अन्य आजार आहेत. अशावेळी त्यांनी आपल्या मुलीला सत्तेचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. किम जू ए पहिल्यांदा नोव्हेंबर २०२२ मध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान सार्वजनिकरित्या दिसली. तेव्हापासून ती सातत्याने तिच्या वडिलांसोबत लष्करी परेड, शस्त्रास्त्र चाचण्या, कारखाना उद्घाटन आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जू ए तिच्या वडिलांसोबत बीजिंगच्या दौऱ्यातही सामील झाली होती. तेव्हाच किशोरवयीन मुलगी अशा लष्करी आणि राजनैतिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे चर्चा रंगली होती. त्यानंतर जू एने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तिच्या पालकांसह कुमसुसन पॅलेस ऑफ द सनला भेट दिली. तेव्हापासून जू ए हीच उत्तर कोरियाची भावी शासक होणार, असे मानले जात आहे. कारण प्योंगयांगमधील या पवित्र समाधीस्थळी तिचे आजोबा आणि पणजोबांच्या समाधी आहेत. त्यांना अभिवादन करून जू एने उत्तर कोरियाची प्रमुख होण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले. ( Kim Yo Jong )
=======
हे देखील वाचा : Suneung College : दक्षिण कोरियातील शैक्षणिक स्पर्धेचे भयाण वास्तव
=======
या सर्व घडामोडींमध्ये किम जोंग उन यांची ३८ वर्षीय लहान बहिण किम यो जोंग दुखावल्याचीही चर्चा आहे. किम यो जोंग हिला उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते आणि तिला राजकीय व लष्करी पाठिंबाही आहे. किम यो जोंग तिच्या ज्वलंत आणि विषारी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहे. तिने तिच्या भावाच्या आणि देशाच्या बचावासाठी अनेकदा अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरुद्ध अधिकृत विधाने केली आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात तिला तज्ञ मानले जाते. २०१८ च्या हिवाळी ऑलिंपिकसाठी दक्षिण कोरियाला भेट देणारी ती किम राजवंशाची पहिली सदस्य होती. शिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या शिखर परिषदांमध्येही तिची भूमिका महत्त्वाची होती. सप्टेंबर २०२१ पासून किम यो जोंग देशाची सर्वोच्च कार्यकारी संस्था असलेल्या स्टेट अफेयर्स कमिशनची सदस्य आहे. उत्तर कोरियाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेसाठी दोन महिलांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. उत्तर कोरिया हा एक रूढीवादी आणि पुरुषप्रधान देश आहे. त्यातही किम राजवंशात सत्तेसाठी रक्तपात ही काही नवीन गोष्ट नाही. किम जोंग उन यांनी २०१३ मध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या स्वतःच्या काका आणि मार्गदर्शक जांग सोंग-थेक यांना देशद्रोही ठरवून फाशी दिली. २०१७ मध्ये किम जोंग उन यांचे सावत्र भाऊ किम जोंग नाम यांची मलेशियातील विमानतळावर विषारी रसायनाने हत्या करण्यात आली. म्हणून आता किम जोंग उन सत्तेसाठी आतुर असलेल्या आपल्या बहिणीचे मन कशापद्धतीने वळवतात, याकडे लक्ष लागले आहे. या सत्तासंघर्षातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे उत्तर कोरियामधील घातक शस्त्रसाठा. उत्तर कोरिया हा धोकादायक शस्त्रे असलेल्या जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक मानला जातो. त्यांच्या ताब्यात सुमारे ५० अणुबॉम्ब असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उत्तर कोरियाचा भावी शासक कोण असेल आणि त्याची या शस्त्रसाठ्याबाबत काय भूमिका असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ( Kim Yo Jong )
सई बने
- authoritarian regime
- communist state.
- dictatorship
- elite power dynamics
- family conflict
- internal conflict
- international concern
- Kim dynasty
- Kim Jong Un
- Kim Ju-ae
- Kim Yo Jong
- leadership transition
- Military Power
- North Korea politics
- nuclear arsenal
- Nuclear weapons
- political rivalry
- political succession
- power struggle
- Pyongyang leadership
- regime stability
- South Korea relations
- State Affairs Commission
- succession crisis
- United States tensions