महाराष्ट्राचे प्रभावशाली नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी आकस्मिक अपघाती निधन झाले आणि महाराष्ट्रातील राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी जशी त्यांच्या कुटुंबात, पक्षात निर्माण झाली तशीच ती महाराष्ट्राच्या विद्यमान सरकार मध्ये सुद्धा निर्माण झाली कारण त्यामुळे सरकारमधील उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अर्थमंत्रीपदही रिक्त झाले. आता ही पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून ३१ जानेवारी २०२६ रोजी काहीशा घाईनेच शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपद हे काही घटनात्मक पद नाही. राजकीय सोयीसाठी या पदाचा वापर केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्र्याकडे हंगामी काळासाठी त्या पदाचा चार्ज दिला जातो म्हणून या पदाला महत्व प्राप्त होते. ही शपथ घेण्यापूर्वी दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

खरं म्हणजे अजित पवार यांच्या निधनाला जेमतेम ७२ तास झाले असतानाच आणि पवार कुटुंबीय शोकमग्न अवस्थेत असतानाच हा शपथविधी होईल याची कुणीही कल्पना केली नसेल. सुनेत्रा पवार या सर्वप्रथम प्रकाशझोतात आल्या त्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत. या निवडणुकीत त्यानी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांची नणंद सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी त्यांची वर्णी राज्यसभेत लावली. गेले दीड वर्ष त्या राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्या राज्यसभेच्या अध्यक्षांच्या तालिकेवरही आहेत. त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवच्या. महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मासिंह पाटील यांच्या त्या भगिनी. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. त्यांचा विवाह १९८५च्या डिसेंबरमध्ये अजित पवार यांच्याशी झाला.
हे देखील वाचा
राजकरणातील दादा ते घरातील मंडळींसाठी आधारवड- अजित पवार
त्या उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्या ‘बारामती टेक्सटाईल ‘ या कंपनीच्या ‘चेअरमन’ आहेत. तसेच त्यांनी २०१० मध्ये ‘environmental forum of india ‘ या एन.जी.ओ. ची स्थापना केली. त्या सध्या या संस्थेच्या सी.ई.ओ. आहेत.ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणपूरक ग्रामविकास या क्षेत्रात कार्यरत आहे. सुनेत्राताईना त्यांच्या या कार्याबद्दल ‘ग्रीन वॉरिअर अवॉर्डने सन्मानित केले गेले आहे. तसेच त्या फ्रान्सच्या जागतिक उद्योजक फोरम च्या’थिंक टँकच्या’ २०११ पासून सदस्य आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्रातही रुची आहे. त्या पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या’सेनेट’ च्या सदस्य आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्याही त्या विश्वस्त आहेत. त्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत तर देशपातळीवार त्यांचा क्रमांक दुसरा लागतो. राजस्थानमध्ये दिया कुमारी या २०२४ पासून उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

सुनेत्रा पवार यानी तातडीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून एक प्रकारे शरद पवार /सुप्रिया सुळे यांना एक राजकीय संदेश दिला आहे. (शरद पवार यांच्याशी सल्लामसलत न करता त्यांनी हा निर्णय घेतल्याची बातमी आहे.) सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेला सध्या तरी विराम मिळेल. तसेच आपला पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असून तो इतर कुठल्याही गटात विलीन होणार नाही हेही त्यांनी अधोरेखित केले आहे.आपले धोरण/राजकीय वाटचाल हे शरद पवार यांच्या धोरणापेक्षा स्वतंत्र असेल हेही त्यांनी या कृतीतून स्पष्टपणे दाखवून दिले आहे. सुनेत्रा ताईंच्या मंत्रीमंडळातील प्रवेशाने महाराष्ट्रातील राजकारणाला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीला कुठले वळण मिळेल हा उत्सुकतेचा विषय असणार आहे.
लेखक – रघुनंदन भागवत