Home मनोरंजन टीम ‘तमाशा लाईव्ह’कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा, सादर केली नव्या युगाची ‘नांदी’
मनोरंजन

टीम ‘तमाशा लाईव्ह’कडून मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा, सादर केली नव्या युगाची ‘नांदी’

12
Tamasha Nandi Song

काही महिन्यांपूर्वी बिग बजेट फिल्म ‘तमाशा लाईव्ह’चे पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जबरदस्त लूक बघून अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, हा नक्की कशावर आधारित चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील एक एक गोष्टी आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha) मधील ‘चित्रपटाची नांदी’ (Tamasha Nandi Song) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथे प्रदर्शित करण्यात आले. १०० फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून ‘चित्रपटाची नांदी’ची सुरुवात झाली. या वेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला. मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाटावा, असा हा सोहळा होता.

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. तसेच या खास दिनाचे औचित्य साधत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर या चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

====

हे देखील वाचा: प्रसाद ओक यांना आनंद दिघे यांच्या रुपात बघून बहिण अरुणाताई झाल्या भावूक !

====

‘तमाशा लाईव्ह’बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” आपल्या मराठी संस्कृतीला लाभलेला भव्य परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम मराठी सिनेसृष्टी नेहमीच करत आली आहे. याच परंपरेला आधुनिकतेचा साजही वेळोवेळी चढवण्यात आला. आज नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये एका मोठ्या महोत्सवात ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. त्यासाठी नितीन देसाई यांचे मनापासून आभार मानतो. तसेच या चित्रपटाचे पहिले गाणे इतक्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शित झाले याचाही विशेष आनंद आहे. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार यानिमित्ताने एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शास्त्रीय संगीतातील दिगज्जांचा या गाण्याला आवाज लाभला आहे. ‘तमाशा लाईव्ह’मधून संगीतात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

सोनाली कुलकर्णी ‘तमाशा लाईव्ह’विषयी म्हणते, ” आज इतक्या प्रेक्षकांसमोर ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत. ज्यांच्यामुळे चित्रपट घडतो अशा सर्वांना आमच्याकडून मानाचा मुजरा. आजच्या या शुभदिनी चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.”

====

हे देखील वाचा: जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या ‘भारत माझा देश आहे’चा ट्रेलर प्रदर्शित

====

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”हे गाणे याच दिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचे खास कारण आहे. ज्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली असे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती असून आजच्या दिवशी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी दुसरा शुभदिवस असूच शकत नाही. या गाण्याच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपले योगदान देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्यात आला आहे. हा संगीतमय चित्रपट आहे. संजय जाधवने ज्यावेळी ही संकल्पना मला सांगितली त्या क्षणी ती मला पसंत पडली. एवढ्या मोठ्या उत्सवात आणि एवढ्या प्रेक्षकवर्गासमोर अशा पद्धतीने गाणे प्रदर्शित होण्याची मराठी सिनेसृष्टीतील ही बहुदा पहिली वेळ असावी. ”

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...