कोरोनाच्या संकटामुळे मुंबई-पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. त्यामुळे यंदा समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या 127 वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होणार आहे.
पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 128व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. तसेच भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल.
श्रीं चे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या 60 सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.
Leave a comment