Home गाजावाजा स्पेशल कोरोना लसी प्रमाणेच प्लेगची लस घ्यायला लोक घाबरत होती, पण शाहू महाराजांनी स्वतः लस घेतली आणि त्यावर जब्बर आयडिया शोधून काढली
गाजावाजा स्पेशल

कोरोना लसी प्रमाणेच प्लेगची लस घ्यायला लोक घाबरत होती, पण शाहू महाराजांनी स्वतः लस घेतली आणि त्यावर जब्बर आयडिया शोधून काढली

6
Shahu Maharaj | K Facts

जनतेवरती अस्मानी आणि सुलतानी संकट येताच जनतेला आशा लागलेली असते ती म्हणजे आपल्या प्रशासकाची. सरकार आपल्यासाठी काहीतरी करेल असे जनतेला वाटत असते. पण अशा परिस्थितीत जर सरकारच आपल्या कामात कमी पडले तर जनतेने आशेने नेमके पहायचे कोणाकडे? हा एक प्रश्न उपस्थित होतो.

सध्याची दुसऱ्या कोरोना लाटेची परिस्थिती पाहता असाच काहीसा प्रश्न सरकारवरती उपस्थित करण्यात येत आहे. अपुरा ऑक्सिजन, बेडची कमतरता आणि औषधांचा तुटवडा… यामुळे गेल्या महिन्यात सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

पण जर इतिहासात पाठीमागे जाऊन आपण डोकावण्याचा प्रयत्न केल्या तर, प्लेगच्या साथीवर राजर्षी शाहू महाराजांनी कसा विजय मिळवला होता, ही साथ कोल्हापुरात कशी रोखली होती आणि त्यावर उपाय व व्यवस्थापन कसे केले होते याचा उत्तम नमुना आपल्याला पहायला मिळतो.

त्याकाळी राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी कोल्हापूरची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या तीन वर्षात प्लेग सारख्या महाभयंकर रोगाने कोल्हापूरात थैमान घालायला सुरुवात केली. त्याकाळात अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे रोगावर कोणतेही निदान लवकर होत नसे. त्यामुळे दरवर्षी विविध रोगांनी नऊ ते दहा हजार लोकांना आपला जीव गमवावा लागत असे. अशात प्लेग सारख्या रोगाचा सामना करणे जरा काठीणच होते.

Loka Raja Shahu Maharaj
Loka Raja Shahu Maharaj

पण अशा परिस्थिती शाहू महाराज मागे हटले नाहीत. मुंबईत १८९६ साली प्लेगच्या साथीने थैमान सुरू केले. या प्लेगच्या साथीमुळे हजारो लोक मरण पावले. त्यानंतर पुण्यातही प्लेगने हाहाकार माजवला. पुण्यातही दिवसाला पाचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडत होते.

या परिस्थितीत ब्रिटिशांच्या राजवटीखालील प्रशासनाने प्लेगला रोखण्यासाठी अनेक कठोर प्रयत्न केले. एवढेच काय तर फेब्रुवारी १८९७ मध्ये संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदाही अस्तित्वात आणण्यात आला.

पण प्लेगची साथ आटोक्यात येत नव्हती. प्लेगने आता सातारा बेळगाव सारख्या खेड्यापाड्यातही आपले पाय पसरायला सुरुवात केली होती. आणि अद्याप या साथीवर औषधही मिळाले नसल्याने प्रशासनही हतबल झाले होते.

दरम्यानच्या काळात साथीच्या रोगाविषयी लोकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा होत्या. त्यामुळे अनेकजण आपल्याला प्लेग झाला आहे हे लपवून ठेवत असे. त्यामुळे प्लगेच्या रुग्णांची संख्या वाढत होती. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी कोल्हापूरचे नेतृत्व हाती घेतले आणि बघता-बघता त्यांनी त्यावर उपाययोजना आखत कोल्हापूर संस्थानातले प्लेगने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यास प्रयत्न केले.

त्यासाठी महाराजांनी दळणवळणाच्या मार्गावर प्रवाश्यांची तपासणी व्यवस्था केली. ज्या भागामध्ये या रोगाची लागण आहे तिथून कोणीही बाहेर येऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच प्लेगच्या रुग्णाची माहिती कळविणाऱ्याला महाराजांनी ५ ते १५ रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूद केली.

Chhatrapati Shahu Maharaj
Chhatrapati Shahu Maharaj

गर्दीमुळे प्लेगची साथ पसरेल म्हणून त्याकाळात सुध्दा कोल्हापूरचे दैवत असणाऱ्या ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचं धाडस दाखवत तसं पत्रक संस्थांनाकडून प्रकाशित करण्यात आले. त्याकाळी भरपूर निरक्षरता होती म्हणून शाहू महाराजांनी प्लेगच्या आजाराची माहिती देणारी हजारो भित्तीपत्रके गावोगावी वाटली. तसेच ती गावकऱ्यांना वाचून दाखवायची सोयही केली.

प्लेगची लागण झालेल्या लोकांसाठी गावाबाहेर झोपड्या बांधणे बंधनकारक केले. तसेच प्लेगग्रस्त रुग्ण गरीब असतील तर त्यांना जीवनावश्यक साहित्य सुद्धा कोल्हापूर संस्थांनाकडून मोफत पुरवण्यात आले.

प्लेगचा उद्रेक पाहता कोल्हापूर संस्थानचे दिवाण रघुनाथराव व्यंकोजी सबनीस यांची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. पुढे जाऊन दोन वर्षांनंतर भास्करराव जाधव यांनी प्लेग कमिशनरपदाची सूत्रे हाती घेतली.

कोरोना काळात जशी बेरोजगारीची परिस्थिती समोर आली तशीच परिस्थिती शाहू महाराजांच्या काळात प्लेगमुळे ओढावली होती. त्याकाळात प्लेगमुळे बेरोजगारी सारख्या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत होता.

पण ‘माणसाने संकटातही संधी शोधावी’ या युक्ती प्रमाणे शाहू महाराजांनी त्याकाळी रस्ते, तलाव व विहीर यांची कामे रोजगार हमी स्वरूपात देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.

इतकेच काय तर भारतातील सर्वात पहिला होमिओपॅथी दवाखाना हा याच प्लेगच्या साथीच्या काळात शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे स्थापन झाला होता. तसेच याच काळात शाहू महाराजांनी अनेक सुसज्ज दवाखानेही उभारले होते.

Shahu of Kolhapur
Shahu of Kolhapur

नंतर प्लेगच्या रोगावर लस आल्यानंतरही शाहू महाराजांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी समजातली अंधश्रद्धा आड येत असल्याने महाराजांनी स्वतः आपल्या कुटुंबासह प्लेगच्या साथीची लस टोचून घेतली आणि लोकांना ही लस सुरक्षित असल्याचे पटवून दिले होते. तसेच नंतर त्यांनी लस टोचून घेणाऱ्यास काही रक्कमेचे बक्षीस ही ठेवले होते.

एकंदरीत काय तर राजर्षी शाहू महाराज संकटाच्या काळात कुठे भाषणे देत बसले नव्हते. तर त्यांनी संकटाचा सामना करून, स्वतः लोकांमध्ये जाऊन आपल्या जनतेचे रक्षण केले होते. त्याकाळातली शाहू महाराजांची व्यवस्थापनाची शैली आज आपल्याला बरच काही शिकवून जाते.

– निवास उद्धव गायकवाड

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....