Home साहित्य अंधारगर्भ — अंधारून आलंय चोहीकडे…
साहित्य

अंधारगर्भ — अंधारून आलंय चोहीकडे…

6
Andhargarbh - K Facts

दिवसाढवळ्या पावसाआधी भोवतालानं असं अंधारून येणं खूप भावतं मनाला. का कुणास ठाऊक, हवाहवासा वाटतो हा अंधार. एरवी प्रकाशाचे गोडवे गाणारं मन आणि मनातले विचार उत्कटतेनं धाव घेतात या अंधाराकडे. एक अनामिक आकर्षण वाटतं त्याच्याबद्दल.

खरंतर छान उन्हाळलेला, उजेडी दिवस असतो. उत्साह देणारा. कामक-यांची दैनंदिनी चालू ठेवणारा असा. निगुतीनं संसार करणा-या एखाद्या मध्यमवयीन बाईसारखा. ती कशी रममाण असते आपल्या भरल्या संसारात, निदान दाखवते तरी तसं. प्रत्येक एकल जिवाची दुखरी नस त्या जिवालाच माहीत. तर असा हा मध्यमवयीन दिवस. जरासा पोक्त झालेला. आचारविचारांनी, हालचालींनी, वागणुकींनी. त्या मध्यमवयीन संसारी बाईनं अचानक स्वतःच्याच काळजाचा ठाव घेण्याकरता विमुक्त व्हावं सगळ्या पाशांतून तसं होतं काहीसं या उजेडाच्या दिवसाचं. मूड बदलतो त्याचा आणि मग त्याच्यामुळे आपलाही.

त्या वेड्याचा रंग बदलत जातो, अंतर्बाह्य. तुम्ही जर खरंच जोडले गेले असाल त्याच्या एकेका क्षणाच्या एकेका कणाशी तर उमजू लागेल तुम्हाला, त्याचं क्षणाक्षणाला आत्ममग्न होणं.
ह्याचा रंग बदलतो म्हणजे कसा?

स्वतःच स्वतःचा रंग बदलत नेणं, क्षणभंगुर क्षणांपुरेसं. मला त्याच्या या रंगबदलाचं खूप अप्रूप वाटतं. कॅनव्हासवर जर ह्या रंगाचं वातावरण चितारायचं असेल तर, चित्रकार कसा तयार करत असतील हा अशा अंधाराचा रंग? ना काळा, ना करडा, ना मातकट, ना पांढुरका काळपट, ना काळपट पिवळसर. कोणकोणते रंग एकमेकांत मिसळवले तर ह्याचा रंग तयार होतो, हे एक तोच जाणे.

उजेडानं पाठ फिरवली तरी काही उजेडकण धूमकेतूच्या शेपटासारखे मागे रेंगाळलेले असतात
त्यामुळे अंधारही आपला सगळा संसार थाटत नाही. अशी ही काळाची ‘मधली स्थिती’. एक वेगळं, हवंहवंसं अस्वस्थपण देणारी. मग त्या इतकुशा अंधा-या क्षणांमध्ये काही हरवतं, काही गवसतं.

इथे पु. शि. रेगे ह्यांची एक कविता आठवते, ‘एकहि दळ’ या नावाची…

एकहि दळ झाडाचे
गंवसे ना तें पहिलें,
काय पहा हें झालें
सगळें हरवुन गेलें.

नक्षत्रांची राणी
कोमावुन मावळली,
वा-याची लाट उभी
वरवर जाउन फुटली.

मीच इथें नाहीसा
माझ्यांतुन मालवतों,
काय कुठे आठवतां
आज असा पालवतों.

(— प्रियाळ — पु. शि. रेगे)

ह्या कवितेतली हरवण्याची, कोमावून मावळण्याची, मालवण्याची, पालवण्याची अवस्थांतरं
ह्या पावसाआधीच्या दाटून येणा-या अंधारात हे अनुभव देऊन जातात. अर्थात हे अनोखं असं
काही अनुभवण्याकरता हवं संवेदनांचं मोहोळ, अंतरात जपलेलं. ते क्षण ओळखण्याची
तरलता, हवी त्या अंधाराकरता असोशी आणि अर्थात व्यावहारिक पातळीवर हवा, वेळ.

खरंतर या अंधारापेक्षा त्याच्यामागून येणा-या पावसाची ओढ जास्त असते सगळ्याच जिवांना.
असणारंच. सर्वांचाच लाडका प्रियकर असा तो. तो येणार म्हणून उत्कंठा असतेच सगळ्यांच्या तनामनात. त्याची कहाणीच वेगळी. पण ती तृप्तीची कहाणी असते. त्या तृप्तीपूर्वीची ही क्षणभंगुर तगमग खरं आयुष्य जगवते.

इतर अनेक वेळा बाहेर पावसात भिजायला जावंसं वाटतं. पावसाला भेटायला उंबरा ओलांडावा लागतो. तसं हा अंधार असताना बाहेर मुक्तपणे जावंसं नाही वाटत. कारण का कुणास ठाऊक पण असं वाटतं तोच आलाय उंबरा ओलांडून घरात, शिरलाय देहात, मनात. मग त्याला घरात, देहात, मनात साठवून घ्यावंसं वाटतं.

घरात फक्त एखादा लहानसा दिवा लावावा. जायच्या यायच्या वाटेवर केवळ घरात कुणी
ज्येष्ठ असले तरच, अन्यथा तोही नको. बाकी भोवताल त्या क्षणभंगुर अंधारानंच व्यापलेला
असावा.

शहरातील गजबजलेल्या वातावरणातही निकरानं शांत बसलं तर हा पावसाळी अंधार अनुभवता येतो. किती काही सांगत असतो तो आपल्याला. ऐकण्यासाठी कान आणि समजून घेण्यासाठी तसं अंधारलेलं हृदय हवं. मग ह्या अंधारात हळूच शिरता येतं.

हे असं आसमंताचं भरून येणं म्हणजे भविष्यातील सर्जनाची तयारी. नवनिर्मितीची रुजवात.
त्या वेळी तो अवघा आसमंत भासतो एखाद्या गूढ, गंभीर गाभाऱ्यागत. त्या गाभाऱ्यात शांत बसून राहावं नि तो अंधार अनुभवावा. आपल्या रंध्रारंध्रात साठवून घ्यावं त्याला.

‘गाभारा’ हा शब्द आस्तिकतेशी, श्रद्धाळूपणाशी जोडलेला खरा पण तरीही खरंच काही अंधारलेले गाभारे करतात अंतर्मुख. त्याला हिप्नाॅटिझमही म्हणेल कुणी. पावसाआधीचा हा अंधार खरंच अशी अंधारभूल घालतो आपल्यावर.

त्या वेळी मला तरी एकच अनुभूती येते, ती म्हणजे आईच्या गर्भात अनुभवलेल्या अंधाराची.
अर्थात त्या अवस्थेचा अनुभव कायम सुषुप्तीच्या पातळीवर.
तो ही एक गाभाराच की. एक अंधारं गर्भगृह. तिथला अंधार स्वतःमध्ये रुजवतो नवनिर्मितीची
बीजं. तसाच हाही. म्हणूनच तो जीवीचा सखा वाटतो. हवाहवासा वाटतो.

या अंधारातूनच पुढे जायचं नि अंतरीची नक्षत्रं उजळवायची, पण त्यांची आच कळू द्यायची नाही बाहेरच्या जगाला, इतकी बेमालूमपणे.

पुढचं कोसळणारं जीवन भरभरून अनुभवण्यापूर्वी या अंधारगर्भात शिरून त्याला
आपल्या श्वासात भरून घेणं ही उन्मनी अवस्था असते.

————– © डाॅ. निर्मोही फडके.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sanskrit language
साहित्य

संस्कृत आणि परदेशातील विद्यापीठ

देवांची भाषा म्हणून ज्या भाषेचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचा दिन...

Manusmriti
साहित्य

मनुस्मृती म्हणजे काय? ज्याचा दलितसंबंधित मुद्द्यांशी काय संबंध

राजस्थान मधील जालौर मध्ये अस्पृश्यतेसंदर्भात एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या...

Salman Rushdie
साहित्य

न्युयॉर्कमध्ये चाकूहल्ला झालेले सलमान रुश्दी कोण आहेत?

मूळ भारतीय असलेले ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेतील...

Elena Ferrante
साहित्य

पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?

मोजकी पुस्तकं, टाइम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश, ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत...